छत्रपती संभाजीनगर : सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेच्या अटी व शर्तीची पायमल्ली करून शासनाची आणि ग्राहकांची घोर फसवणूक करणाऱ्या बिल्डरांविरुद्ध गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) कारवाईचा कडक बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील तब्बल २३ बिल्डरांवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे लेखी पत्र म्हाडाचे मुख्य अधिकारी वैभव केदारे यांनी पोलिस आयुक्तांना दिले आहे. या कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रातील बिल्डरांची चालबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
शासनाच्या यूडीसीपीआर-२०२० च्या नियम ३.८.२ (अ) व (ब) नुसार ४ हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या खासगी भूखंडावर विकास करताना बिल्डरांनी २० टक्के क्षेत्रफळाचे विकसित भूखंड अथवा बेस एफएसआयच्या २० टक्के क्षेत्रफळाच्या ३० ते ५० चौरस मीटरच्या सदनिका अल्प उत्पन्न/अत्याल्प उत्पन्न गटाच्या लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, या तरतुदींचे अनेक ठिकाणी उल्लंघन होत आहेत. अनेक बिल्डर म्हाडाकडे २० टक्के सदनिका न देता परस्पर राखीव सदनिकांची विक्री करीत आहेत.
शहरातील बिल्डरांकडूनही अशीच फसवणूक झाल्याच्या प्रकाराबाबत युवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने बाळासाहेब नरवडे, पुष्पानंद नितनवरे यांनी म्हाडाच्या मुंबईतील कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार म्हाडाने कारवाईची सुरू केली आहे. शहरात २३ पैकी १९ विकासकांनी ८१४ सदनिका म्हाडाकडे हस्तांतरित केल्या नसल्याचे प्रशासनाच्या चौकशीत पुढे आले आहे. एवढेच नव्हे तर ३१ पैकी ३० विकासकांनी ७१,१३४.५४ चौ.मी. भूखंड हस्तांतरित केले नाही.
सध्या या सदनिका व भूखंडांची विक्री सुरू असल्याचे म्हाडाला आढळून आले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक आणि कमी उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत असून या प्रकरणात म्हाडाचे मुंबईतील मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी यांनी विकासकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य अधिकारींना दिले आहेत.
'त्या' विकासकांना काळ्या यादीत टाकावे
संबंधित विकासकांविरुद्ध महारेराकडे तक्रार दाखल केली जाणार आहे, त्यासोबतच सुरू असलेल्या प्रकल्पांना काम थांबविण्याच्या नोटीस महापालिकेने द्याव्यात, असे पत्रही महापालिकेला दिले जाणार आहे. तर विकासकांना म्हाडाच्या प्रकल्पांसाठी काळ्या यादीत टाकावे असे स्पष्ट निर्देश म्हाडाच्या स्थानिक कार्यालयाला दिले.
तपासणीत फसवणुकीचा गंभीर प्रकार उघड
म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा विभागाने केलेल्या तपासणीत हा गंभीर प्रकार समोर आला आहे. विकासकांनी सदनिका व भूखंड म्हाडाला न सोपवल्यामुळे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील शेकडो लाभार्थी हक्काच्या घरापासून वंचित राहिले आहेत. ही शासनाची आणि सर्वसामान्यांची थेट फसवणूक असल्याचे म्हाडाने पत्रात स्पष्ट केले आहे.
सदनिका न देणारे प्रकल्प (०५ प्रकल्प)
मे. नमो रिअल्टीतर्फे भागीदार अमीन अब्दुला सुराणी व कमरुद्दीन करीम भारवाणी (गट क्र. १३७भाग, सातारा - २३ सदनिका)
दिलीपकुमार रमणलालजी बाकलीवाल व इतर (गट क्र. ३९ भाग, सातारा १०८ सदनिका)
सम्यक निवास हक्क संघ, प्रयोजक भिम फाऊंडेशनतर्फे अध्यक्ष मधुकर विठ्ठल सूर्यवंशी व इतर (गट क्र. ११/२, भावसिंगपुरा - ३६ सदनिका)
त्रिलोकसिंग तारासिंग जंविदा (गट क्र. २६/पैकी, शहानूरवाडी, मौजे सातारा - २८ सदनिका)
मे. पीयूष इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लि. तर्फे प्रल्हाद हरीराम पन्हाळे (गट क्र. २३ व २५/पैकी, शहानूरवाडी १२ सदनिका)
भूखंड म्हाडाकडे हस्तांतरित न करणारे प्रकल्प (१८ प्रकल्प):
जे. के. सहकारी गृहनिर्माण संस्था (सातारा, गट क्र. ५३)
सुमित शिवकिशोर त्रिवेदी व इतर (नक्षत्रवाडी, गट क्र. ८६)
मे. युनिक डेव्हलपर्सतर्फे सिद्धार्थ संजीवकुमार कांकरिया व इतर (भावसिंगपुरा, गट क्र. १०/२)
प्रभाकर अ. देशमुख (मिटमिटा, गट क्र. १४१) यासिन खान याकुब खान व इतर (सातारा, गट क्र. ५६)
सुमतीलाल बन्सीलाल मुनोत व इतर (सातारा, गट क्र. १७४)
रसुल खान साहेब खान (गट क्र. २००)
अनिल बळीराम पाटील व इतर (सातारा, गट क्र. २०)
रवींद्र सानप व इतर (नक्षत्रवाडी, गट क्र. ११/पैकी)
इकबाल खान बहाद्दरखान पटेल व इतर (गट क्र. २०२/पैकी, सातारा)
प्राईड प्रॉपर्टीज अँड रिअलटर्सतर्फे मिलिंद बापट व इतर (गट क्र. १८९/पैकी, सातारा)
अनिरुद्ध दिनेशचंद्र सोमाणी व इतर (गट क्र. ५/पैकी, नक्षत्रवाडी)
प्रतिभा रमेश तिळवणकर व इतर (गट क्र. ४७/पैकी, नक्षत्रवाडी)
उल्हास दत्तात्रय शिरूरकर व इतर (गट क्र. २१२/पैकी, सातारा)
सुमित्रालाल मांगीलाल कटारिया (गट क्र. ४४/पैकी, नक्षत्रवाडी)
नीलेश श्रीनिवास चंचानी व इतर (भूखंड क्र. १, गट क्र. २२१/पैकी, सातारा)
आर.एम.आर.एन. व्हेंचर्सतर्फे राजेश जेठमलजी परमार व इतर (गट क्र. १११/पैकी, नक्षत्रवाडी)
साधना सुमतीलाल मुनोत व इतर (गट क्र. १८७, १८९, १९०, १९१/पैकी, सातारा)