Crime News : नोंदणी रद्द झाल्याच्या रागातून माथाडी मुकादमासह मुलावर हॉकी स्टिकने हल्ला File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : नोंदणी रद्द झाल्याच्या रागातून माथाडी मुकादमासह मुलावर हॉकी स्टिकने हल्ला

माथाडी कामगार मंडळासमोरील घटना; क्रांती चौक पोलिसांत १० ते ११ जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Mathadi supervisor and his son attacked with hockey sticks

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : माथाडी कामगारांची नोंदणी शासनाने रद्द केल्याच्या रागातून एका गटाने ६२ वर्षीय मुकादम आणि त्यांच्या मुलावर हॉकी स्टिक व लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि.२९) दुपारी २ वाजेच्या सुमारास बाबा पेट्रोलपंपामागे असलेल्या भाग्यनगर येथील माथाडी कामगार मंडळ कार्यालयासमोर घडली. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात मुख्य आरोपी राहुल जगदीश चौधरी (४०, रा. माय वर्ल्ड अपार्टमेंट, चिकलठाणा), प्रशांत आटोळे (२५, रा. गारखेडा परिसर), श्रीराम ज्ञानदेव काकडे (४३, रा. वडखा) आणि इतर ७ ते ८ अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रमेश रामलाल ब्राम्हणजाई (६२, रा. करमाड) यांच्या तक्रारीनुसार, ते शेंद्रा एमआयडीसीत वराई स्वरूपाचे माथाडी मुकादम म्हणून काम पाहतात. शासनाने त्यांच्या सभासदांची नोंदणी कायम ठेवली असून, आरोपी राहुल चौधरी याच्या कामगारांची नोंदणी रद्द केली आहे. याचा राग आरोपीच्या मनात होता.

रमेश ब्राम्हणजाई हे बुधवारी दुपारी त्यांचा मुलगा सतीश आणि मेव्हणा सूर्यप्रकाश बन्सवाल यांच्यासोबत माहिती अधिकाराच्या कामासाठी मानव विकास भवन येथील माथाडी कामगार मंडळ कार्यालयात आले होते. काम आटोपून ते खाली आले आणि कारचा दरवाजा उघडत असतानाच, राहुल चौधरी व त्याच्या साथीदारांनी त्यांना गाठले. संघटनेचे सभासद असलेल्या माथाडी कामगारांची नोंदणी रद्द केली, असे म्हणत आरोपींनी बाप-लेकावर लाठ्या-काठ्या आणि हॉकी स्टिकने हल्ला चढवला.

राहुल चौधरी याने हॉकी स्टिकने रमेश यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्याखाली मारून दुखापत होऊन चार टाके पडले आहेत. तसेच मुलगा सतीश यालाही पोटावर, पाठीवर, पायावर आणि डोक्यावर हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. तुम्हाला केंब्रिज चौक पार करू देणार नाही, अशी धमकी देत आरोपींनी दहशत माजवली. पुढील तपास उपनिरीक्षक गणेश कोळी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT