Sambhajinagar Massive fire at cattle shed; Five lives were lost
उंडणगाव, पुढारी वृत्तसेवा सिल्लोड तालुक्यातील खुल्लोड गावालगत बुधवारी (दि. १४) रात्री ८ वाजेच्या सुमारास जनावरांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत पाच जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत शेतकरी परमेश्वर बसैये आणि योगेश बसैये यांचे साडेतीन लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाले आहे.
बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोठ्यात अचानक आग लागली. गोठ्यात साठवून ठेवलेला चारा आणि कुट्टीने पेट घेतल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची तीव्रता वाढल्याने गोठ्यातील जनावरांना वाचविण्याची संधी मिळाली नाही. पाहता पाहता गोठ्यातील चारा आणि इतर साहित्य जळून खाक झाले.
या आगीत परमेश्वर बसैये यांची बैलजोडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तर योगेश बसैये यांच्या दोन गाभण गायी आणि एका वासराचाही होरपळून मृत्यू झाला. शेतीच्या कामासाठी आणि उदरनिर्वाहासाठी महत्त्वाचा आधार असलेल्या या जनावरांचा मृत्यू झाल्याने दोन्ही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुक्या जनावरांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बसैये कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महसूल व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पाहणीघटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय मोरे आणि डॉ. चंद्रकांत म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन जनावरांचे शवविच्छेदन केले. तलाठी पी. व्ही. गायकवाड आणि तहसीलदार सागर वाघमारे यांना घटनेची माहिती देण्यात आली. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर यांची घटनास्थळी भेट भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकरी परमेश्वर बसैये यांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
अचानक घडलेल्या या आगीच्या घटनेमुळे बसैये कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेती आणि पशुधनावर अवलंबून असलेल्या या कुटुंबांना या संकटातून सावरण्यासाठी तातडीच्या आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे शासनाने घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.