Chhatrapati Sambhajinagar Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : लग्नाच्या चारच महिन्यांत विवाहितेने जीवन संपवले?

माहेरच्यांकडून घातपाताचा संशय

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शासकीय नोकरीला असल्याची थाप मारून आधी लग्न केले. लग्नानंतर काही दिवसांतच पतीचा बनाव उघड झाला. त्यातच सासरच्या मंडळीकडून स्वयंपाक आणि कपड्यांवरून विवाहितेला सतत हिणवणे सुरू झाले. या दुहेरी मानसिक धक्क्यात असलेल्या एका २३ वर्षीय विवाहितेने अवघ्या चार महिन्यांतच सासरी गळफास घेतल्याचे समोर आले आहे.

ही घटना हडकोतील (एन-१३) वानखेडेनगर भागात मंगळवारी (दि. १३) उघडकीस आली. संजना नीलेश शेजवळ (२३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, तिच्या माहेरच्यांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

संजनाचे वडील व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संजनाचा विवाह ४ जून २०२६ रोजी नीलेश शेजवळ याच्यासोबत झाला होता. रविवारी (दि.१३) सकाळी संजना घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत गेली होती, तर पती नीलेश खाली होता. काही वेळाने संजनाची सासू अचानक ओरडत खाली आली आणि तिने नीलेशला घटनेची माहिती दिली. त्यानंतर घाबरलेल्या सासरच्या मंडळींनी संजनाला तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार संजनाने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. या प्रकरणात संजनाचे वडील रावसाहेब मगरे (रा. जालना) यांनी सासरच्या मंडळींवर फसवणुकीचे आणि छळाचे गंभीर आरोप केले आहेत. लग्नापूर्वी नीलेशने आपण शासकीय नोकरदार असल्याचे थाटात सांगितले होते. मुलगा एवढ्या मोठ्या पदावर असल्याने चांगले स्थळ चालून आले, या विचाराने रावसाहेब यांनी आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून दिले.

मात्र, लग्नानंतर नीलेशचा बनाव काही महिन्यातच उघड झाला होता. तो अधिकारी नसून, वैद्यकीय शिक्षणासाठी मुलांना परदेशात पाठवणाऱ्या एका खाजगी कन्सल्टन्सी संस्थेचे काम करत असल्याचे संजनाच्या कुटुंबीयांना समजले होते. तसेच संजनाला सासरच्यांनी छोट्या छोट्या गोष्टीवरून मानसिक त्रास दिल्याच्या आरोप नातेवाईकांनी केला.

मृत्यूच्या आदल्या रात्री आईला कॉल

मृत्यूच्या आदल्या रात्री (दि.१२) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संजनाचे तिच्या आईसोबत फोनवर बोलणे झाले होते. छोट्या छोट्या गोष्टीवरून घरातील सदस्य टोमणे मारत असल्याचे तिने आईला सांगितले होते. दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाल्याची माहिती संजनाच्या वडीलांनी समजली. संजनाच्या दिराने रविवारी दुपारी ११:४० वाजता रावसाहेब मगरे यांना फोन करून घटनेची माहिती दिली.

विशेष म्हणजे, वैद्यकीय नोंदीनुसार संजनाला नेमक्या त्याच वेळेत एमजीएममध्ये दाखल केले होते. घटना घडल्यानंतर सासरच्यांनी मुलीच्या माहेरच्याना खूप उशिरा माहिती दिल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव, उपनिरीक्षक मनीषा केदार यांनी एमजीएम आणि घाटी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला. अवघ्या चार महिन्यांतच संजनाचा मृत्यू झाल्याने हा मृत्यू नेमका कसा झाला आणि यात सासरच्यांचा नेमका सहभाग काय, याचा सविस्तर तपास बेगमपुरा पोलिस करत आहेत. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT