Sambhajinagar News : एमआयडीसीची दयनीय अवस्था बघवत नाही File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : एमआयडीसीची दयनीय अवस्था बघवत नाही

अमेरिकेहून आलेले जुगल मालपाणी यांची तळमळ, पायाभूत सुविधांचे मूल्यांकन अन् सुधारणा होणे गरजेचे

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Lack of infrastructure and poor condition in MIDC

राहुल जांगडे :

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मी २५ वर्षांपासून अमेरिकेत राहतो. मात्र, छत्रपती संभाजीनगरातच जन्मलो, वाढलो आणि घडलो. त्यामुळे आपल्या शहराविषयी प्रेम आणि आपुलकी असल्याने इथल्या एमआयडीसीत पायाभूत सुविधांची कमतरता आणि दुरावस्था बघवत नाही. या पायाभूत सुविधांचे मूल्यांकन होणे आणि त्यात सुधारणा होणे गरजेचे असल्याचे मत अमेरिकेहून आलेले उद्योजक जुगल मालपाणी यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना व्यक्त केली. उद्योजकांना पुरेशा आणि दर्जेदार सुविधा मिळाल्या तर उद्योगांची आणि शहराची आणखी भरभराट होईल. असेही त्यांनी नमूद केले.

शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सध्या काम मिळवायचे... ते निकृष्ट करायचे आणि पितळ उघडे पडलेच तर प्रशासनाच्या आशीर्वादाने पुन्हा थातूर-मातूर पॅचवर्क करून कागदोपत्री ओके मिळवून विषय संपवायचा असले प्रकार बिनबोभाट सुरू आहेत. यामुळे फाइव्ह स्टार इंडस्ट्रीची पुरती वाट लागली आहे. एमआयडीसीच्या प्रवेश मार्गासह अनेक रस्त्यांचे निकृष्ट काम झाल्याने ते रस्ते काही महिन्यांतच उखडून अत्यंत दयनीय दुरवस्था झालेली आहे.

दर्जाहीन कामांमध्ये येथील रस्त्यांची अक्षरशः धुरळा झाला आहे. जागोजागी पडलेले खड्डे, रस्त्याच्या चाळणीमुळे खडी पसरल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. मात्र, या बोगस कामांची एमआयडीसीकडून पाठराखण सुरू असल्याचे दिसत आहे. निकृष्ट आणि दर्जाहीन कामे करणाऱ्यांकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच साफ दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक उद्योजक, कामगार त्रस्त झाले आहे.

याचीच खदखद नुकतीच उद्योजकांच्या परिषदेत शासनाचे गुंतवणूक आणि धोरण सल्लागार कौस्तुभधवसे यांच्यासमोर उमटली. परिषदेला उपस्थित अमेरिकेहून आलेले जुगल मालपाणी यांनी येथील एमआयडीसीमधील मूलभूत सोयीसुविधांमध्ये जागतिक दर्जाच्या सुधारणांची नितांत गरज असल्याचे मत स्पष्टपणे मांडले. तर स्थानिक उद्योजकांकडूनही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण चांगले रस्ते, पथदिवे, ड्रेनेज व्यवस्था देणे एमआयडीसी प्रशासनाची जबाबदारी द्यावी. त्यामुळे बोगस आणि निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी उद्योगजगतातून केली जात आहे.

सुविधा देणे एमआयडीसीची जबाबदारी

औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांना चांगले आणि गुणवत्तापूर्ण रस्ते आणि पायाभूत सुविधा देणे हे एमआयडीसी प्रशासनाचीच जबाबदारी आहे. खराब रस्त्यांमुळे उद्योगांसमोर अनेक अडचणी येतात. मुख्य म्हणजे दळणवळणाची गती मंदावून उद्योगांची प्रगतीला खीळ बसते.

नवे रस्ते उरवडल्याचा राग आणि आश्चर्य एमआयडीसीत नवीन केलेल्या रस्त्याला सहा महिन्यांत जागोजागी खड्डे पडले. हे बघून राग व्यक्त करावा की आश्चर्य हे समजत नाही. अशी परिस्थिती आहे. खराब रस्त्यामुळे रोजच्या दळणवळणाला फार अडचणी आहे. वारंवार वाहने नादुरुस्त होता. हे कुणाला सांगावे, याचा त्रास स्थानिक उद्योजकांनाच सहन करावा लागत आहे.
-बसवराज मोरखंडे, स्थानिक उद्योजक
खराब रस्ते, मूलभूत सुविधांची वानवा पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वसाहतीत खराब रस्त्यांची मोठी समस्या आहे. यांसह विस्कळीत पाणीपुरवठा, अपुरे पथदिवे, ड्रेनेज व्यवस्था आणि कामगारांसाठी दळणवळण व्यवस्थेचा अभावाने त्रस्त केले आहे. अनेक वर्षांपासून या समस्या दूर झालेल्या नाही. यात सुधारणा होणे आवश्यक आहे.
-प्रमोद देवकर, स्थानिक उद्योजक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT