छत्रपती संभाजीनगर : कारागृहात बंदिस्त असलेले कुख्यात गुंड शहरातील नागरिकांमध्ये आपली दहशत कायम ठेवण्यासाठी आणि तरुणांमध्ये गुन्हेगारीचे आकर्षण निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठा गैरवापर करत आहेत. कारागृहात असतानाही आपले वर्चस्व दाखवण्यासाठी नातेवाईक आणि साथीदारांमार्फत आक्षेपार्ह 'रील्स' तयार करून ते व्हायरल करत आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कारवाईचे आदेश देताच पोलिसांनी एकाच आठवड्यात तब्बल ८ गुन्हे दाखल करून कायद्याचा हिसका दाखवला आहे.
कारागृहात शिक्षा भोगत असलेले गुंड कायद्याला आव्हान देणारे व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकत होते. या 'रील्स'मध्ये घातक शस्त्रांचे प्रदर्शन करणे, हातात हातकडी असताना दादागिरी दाखवणे, तसेच मोबाईल वापरण्यास बंदी असलेल्या न्यायालय आणि हर्सल कारागृह परिसरात चित्रीकरण करणे असे गंभीर प्रकार सुरू होते.
या व्हिडिओंना चिथावणीखोर संगीत देऊन नातेवाईक व मित्रांच्या मदतीने ते पोस्ट केले जात होते, जेणेकरून समाजात दहशत निर्माण व्हावी. यावर सायबर पोलिसांनी कारवाई करत नुकतेच आणखी ४ गुन्हे (सार्वजनिक शांतता भंग करणे आणि समाजात भीती पसरवणे) दाखल केले आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक कदिर देशमुख, उपनिरीक्षक गणेश गिरी, हवालदार योगेश तळवंदे, सोनाली वडनेरे, संगीता दुबे, गोकुळ कुतरवाडे, अभिजीत खोतकर आणि अल्ताफ पठाण यांच्या पथकाने केली.
या गुन्हेगारांवर आणि 'प्रोफाईल'वर गुन्हे दाखल
पवन दिवेकर (पोलिस ठाणे: जवाहरनगर) पीडी कंपनी महाराष्ट्र या प्रोफाईलचा वापरकर्ता.
टिपू शेख ऊर्फ टिप्या : (पोलिस ठाणे: जवाहरनगर) - 'टिपू शेख ३०२ या प्रोफाईलचा वापरकर्ता.
इम्रान मेहंदी : (पोलिस ठाणे: बेगमपुरा) - रुहीना इम्रान मेहंदी या प्रोफाईलचा वापरकर्ता.
विशाल पुसे : (पोलिस ठाणे: बेगमपुरा) - विशाल पुसे १०९ या प्रोफाईलचा वापरकर्ता.
गुन्हेगारीचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही - गुन्हेगारांनी टाकलेल्या रील्स मागे केवळ प्रसिद्धीचा हेतू नसून, कारागृहात असतानाही टोळीची दहशत कायम ठेवणे आणि त्यातून आर्थिक फायदा मिळवणे हा मुख्य उद्देश असल्याचा संशय आहे. त्याची सखोल चौकशी सुरू आहे. समाजमाध्यम हे अभिव्यक्तीचे साधन आहे, गुन्हेगारीचे ग्लॅमरायझेशन करण्याचे नाही. जे कोणी समाजमाध्यमांवर शस्त्रांचे प्रदर्शन करणारे आणि गुन्हेगारांचे समर्थन करणारे रील्स तयार करून पोस्ट करतील किंवा शेअर करतील, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील.प्रवीण पवार, पोलिस आयुक्त