industrial slowdown Sambhajinagar pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

industrial slowdown Sambhajinagar : संभाजीनगरच्या उद्योगाला आखाती युद्धाची मोठी झळ!

गॅस टंचाईने ५ मोठे उद्योग बंद; ४५ युनिट्स गॅसवर

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात भडकलेल्या आखाती युद्धाची मोठी झळ आता थेट छत्रपती संभाजीनगरच्या उद्योगनगरीला बसली आहे. भयंकर गॅस टंचाई निर्माण झाल्याने शहरातील तब्बल ५ मोठे उद्योग बंद पडले असून, उर्वरित ४५ युनिट्स अक्षरशः गॅसवर आहेत. रोज ३०० मेट्रिक टन गॅसची गरज असताना साठा संपत आल्याने किमान २० कंपन्यांवर आजपासून मंगळवारी (दि.१०) टाळे लागण्याची वेळ आल्याने संपूर्ण उद्योगनगरी मोठ्या संकटात सापडली आहे.

आशिया खंडात अतिशय झपाट्याने औद्योगिक विस्तार झालेले शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. आता ईव्ही आणि ऑटो कंपन्यांमुळे इलेक्ट्रिक वाहनांचे हब म्हणूनही हे शहर नावारूपाला येत आहे. येथील शेंद्रा, वाळूज आणि चिखलठाणा औद्योगिक वसाहतींमधून देश-विदेशातील कंपन्यांना सुट्टे भाग (स्पेयर पार्ट्स) पुरवणारे अनेक युनिट्स आहेत.

येथील ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि स्टील कंपन्यांना उत्पादनासाठी गॅसचा मोठा साठा लागतो. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर भडकलेल्या युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून गॅसचा पुरवठा कमालीचा घटल्याने अनेक उद्योग संकटात सापडले आहेत. ऑटो इंडस्ट्री, स्टील कंपनी आणि फार्मा कंपन्यांना या गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका बसत आहे. गॅस टंचाईमुळे आणखी ३० ते ४० उद्योग बंद होण्याच्या मार्गावर असल्याची भीती मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केली.

या कंपन्यांचे उत्पादन ठप्प

गॅस अभावी शहरातील सवेरा ऑटो, कृष्णा कोटिंग, चंद्रा इलेक्ट्रिकल, स्वराज इंजिनिअरिंग आणि लक्ष्मी इंजिनिअरिंग या पाच मोठ्या कंपन्यांनी आपले उत्पादन पूर्णपणे बंद केले आहे.

२० कंपन्यांकडे अवघा एका दिवसाचा साठा

उद्योगनगरीतील गॅसवर अवलंबून असलेल्या १५ ते २० युनिट्सकडे अवघ्या एका दिवसाचा गॅस साठा शिल्लक आहे. हा साठा संपल्यानंतर त्यांनाही आज (मंगळवार) पासून उत्पादन नाइलाजाने बंद करावे लागेल, अशी माहिती मसिआचे अध्यक्ष गायकवाड यांनी दिली.

रोज लागते ३०० मेट्रिक टन गॅसची गरज

छत्रपती संभाजीनगरातील सुमारे ५० हून अधिक उद्योगांना पावडर कोटिंग, फोर्जिंग, चेसिस आणि ऑटो पार्ट्सचे उत्पादन यांसह होम अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रिकल पॅनल उत्पादनासाठी गॅसची नितांत गरज पडते. यासाठी शहरात दररोज साधारण २५० ते ३०० मेट्रिक टन गॅस लागतो. मात्र पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने अनेक उद्योग आता व्हेंटिलेटरवर आले आहेत.

रिक्षाचा प्रवास महागणार; एलपीजी गॅसच्या दरात एकाच दिवसात १३ रुपयांची वाढ

जागतिक घडामोडींचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. शहरात मोठ्या संख्येने धावणाऱ्या एलपीजी रिक्षांच्या इंधन दरात सोमवारी (दि.९) एकाच दिवसात १३ रुपयांची मोठी वाढ झाली. कालपर्यंत ६२ रुपये प्रतिलिटर मिळणारा गॅस आता ७५ रुपयांवर पोहोचला असून, यामुळे शहरातील रिक्षा प्रवास महागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलासह गॅसच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. परिणामी, शहरातील गॅस पंपांवर रिक्षाचालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT