छत्रपती संभाजीनगर: राहुल जांगडे
पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीत कुठे तुटलेले दिवे, तर कुठे नुसतेच खांब उभे... उघड्या धोकादायक फिटिंग आणि लोंबकळणारी वायर... यामुळे रस्त्यांवर काळाकुट्ट अंधार... असे दयनीय चित्र दररोज संध्याकाळनंतर दिसून येते. येथील प्रमुख मार्ग सोडला तर बहुतांश रस्त्यांवरील पथदिवे बंद पडलेली आहेत. गंभीर म्हणजे, पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी २७ लाखांचे टेंडर काढले जाते. मात्र प्रत्यक्षात पथदिव्यांची दुरवस्था सुधारलेली नाही. दुरुस्तीच्या नावाने ठेकेदार आणि प्रशासन वर्षभर नुसते कागदोपत्रीच दिवे लावत असल्याने एमआयडीसीत अंधार पसरला आहे, असा संताप उद्योगजगतातून व्यक्त होत आहे.
मराठवाड्यातील औद्योगिक प्रगतीचा मार्ग सुकर करणाऱ्या शेंद्रा एमआयडीसीत लहान-मोठे एक हजाराहून अधिक उद्योग आहेत. या उद्योगांना लख्ख प्रकाश पाडणाऱ्या पथदिव्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाची आहे. यासाठी २००० लाइट्स, ११०० फिटिंग आणि ८५० हून अधिक पोल आहेत. हे पथदिवे चालू ठेवण्यासाठी दरवर्षी २७ लाखांचे टेंडर काढले जाते. मात्र प्रत्यक्षात ठेकेदार पथदिव्यांची देखभाल दुरुस्ती करतोय की नाही, याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होते. यामुळे ठेकेदार निर्वावून दुरुस्तीच्या नावाखाली नुसतीच बोंबाबोंब सुरू आहे.
येथील बी सेक्टर, डी ब्लॉक, सी ब्लॉक, फूट पार्कसह अनेक अंतर्गत रस्त्यांवरील बहुतांश पथदिवे बंद पडले आहेत. यामुळे दररोज सांयकाळनंतर रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरत असल्याने वळणावर अपघात, लहान-मोठ्या चोऱ्या असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांनी वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती न झाल्याने धोकादायक उघडी फिटिंग, गंजलेले पोल आणि त्यावर लाईट नाही. उघडे लटकलेली केबल हे चित्र बदललेले नाही. यावरही ठेकेदारावर जबाबदार अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने मनमानी सुरू आहे. याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने हतबल उद्योजकांनी त्यांच्या कंपनीसमोर मोठे लाईट लावले आहेत.
ठेकेदारीला एमआयडीसीकडूनच प्रोत्साहन
दरवर्षी लाखोंचे टेंडर काढून ही औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक फिटिंग, गंजलेले पोल आणि त्यावर लाईट नाही, उघडी केबल हे चित्र बदललेले नाही. बहुतांश अंतर्गत रस्त्यांवर अंधार असताना ठेकेदारांविरोधात कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे एमआयडीसीकडूनच ठेकेदारांच्या उद्योगधंद्याला प्रोत्साहित केले जात असल्याचा संताप उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.
ठेकेदारावर वचक नाही - पथदिवे दुरुस्तीसाठी एमआयडीसीकडून दरवर्षी लाखो रुपयांचे कंत्राट दिले जाते, मात्र त्या ठेकदारावर एमआयडीसीचा वचक नसल्याने पथदिवे बंद, पोलची दुरवस्था झालेली आहे. रात्री सेकंड शिफ्टनंतर अंधारामुळे चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. याचा त्रास उद्योजकांना होत आहे.अर्जुन गायकवाड, अध्यक्ष, मसिआ.
इकडचे चालू दिवे, तिकडे लावण्याचे धंदे
गतवर्षी असंसो लाईट्स यांना एमआयडीसीतील पथदिव्यांच्या दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले होते. दुरुस्तीच्या नावाने त्यांनी वर्षभर कागदोपत्री दिवे लावले. वारंवार तक्रारीनंतरही पथदिवे सुरू झाले नाही. कुठे जास्तच ओरड झाली तर दुसरीकडचे चालू दिवे काढून इकडे लाव, जिथे तक्रार तिथलेच लाईट सुरू करणे, असे उद्योग झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.
लाईट सुरू व्हावे - एमआयडीसी असल्याने चांगले रस्ते आणि सर्व पथदिवे सुरू असावे, अशी किमान अपेक्षा उद्योजकांची आहे. प्रशासन, ठेकेदाराने येथील बंद पडलेले पथदिवे त्वरित सुरू करावे.प्रमोद देवकर, स्थानिक उद्योजक.
पुन्हा दिले नव्या एजन्सीला कंत्राट
शेंद्रा एमआयडीसीतील पथदिव्यांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवून ५ नोव्हेंबरला शहरातील बिटा इलेक्ट्रिकल यांना कंत्राट देण्यात आले. मात्र एजन्सीने मागील पंधरा दिवसांत कुठे-कुठे पथदिवे बंद, काय स्थिती याची साधी पाहणी केलेली नाही. त्यामुळे एमआयडीसीतील बंद पथदिवे सुरू होऊ शकलेले नाही.
पथदिवे अनेक वर्षांपासून बंद - 'बी' सेक्टर येथील अनेक पथदिवे मागील ५ ते ७ वर्षांपासून बंद आहेत. याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही पथदिवे सुरू झालेले नाही. कंत्राट बदलले, ते बघतील. लवकरच पथदिवे सुरू होतील, असे उत्तर मिळते. नाइलाजाने कंपनीसमोरच लाईट लावले आहे.निशान जैन, स्थानिक उद्योजक.