Pradhan Mantri Dhan-Dhanya Krishi Yojana : उत्कृष्ट कृषी कामगिरीने संभाजीनगरचा दिल्लीत सन्मान file photo
छत्रपती संभाजीनगर

Pradhan Mantri Dhan-Dhanya Krishi Yojana : उत्कृष्ट कृषी कामगिरीने संभाजीनगरचा दिल्लीत सन्मान

प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील सर्वोत्कृष्ट १० जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरची निवड झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar honored in Delhi for outstanding agricultural performance

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील सर्वोत्कृष्ट १० जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरची निवड झाली आहे. याबद्दल जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा केंद्र शासनाच्या वतीने सोमवारी (दि. १२) नवी दिल्ली येथे सन्मान करण्यात येणार आहे.

कृषी उत्पादकता, पीक तीव्रता तसेच कृषी कर्ज वितरणाच्या बाबतीत तुलनेने कमी कामगिरी असलेल्या देशातील १०० जिल्ह्यांसाठी ही योजना ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू करण्यात आली. केंद्र शासनाच्या ११ विभागांच्या ३६ योजनांचे अभिसरण, राज्य शासनाच्या विविध योजना आणि खासगी क्षेत्राच्या सहभागातून योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.

योजनेच्या मासिक प्रगतीचे निर्धारित प्रमुख कामगिरी निर्देशकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत 'टॉप-१०'मध्ये निवड झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी ही माहिती दिली. नवी दिल्लीतील राष्ट्रीय कृषी विज्ञान संस्था कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता विशेष कार्यक्रम होणार आहे.

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री तसेच संबंधित केंद्रीय मंत्रालये व विभागांचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी विनय गौडा आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी या कार्यक्रमास उपस्थित राहतील. हा गौरव प्रशासनाचा नसून कृषी विभाग आणि सर्व संबंधित कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे. शेतकरी कल्याणासाठी भविष्यातही नवनवीन उपक्रम राबवू, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी गौडा यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT