हंगामातील रेकार्ड ब्रेक तापमान, पारा ४१.०८ अंशांवर pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar temperature : हंगामातील रेकार्ड ब्रेक तापमान, पारा ४१.०८ अंशांवर

उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण; देखभाल-दुरुस्तीसाठी वीज गुल झाल्याने त्रासात भर

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहराचे तापमान सलग १५ दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. सकाळी १० वाजेपासूनच सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याने उन्हाचा तडाखा वाढला आहे. शनिवारी (दि. २५) शहराचे कमाल तापमान ४१.०८ अंशांवर पोहचल्याने हा दिवस या हंगामातील हा सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. उष्णतेच्या लाटेमुळे दिवसभर असह्य चटके आणि झळांनी शहरवासीयांना हैराण केले आहे.

या महिन्याच्या सुरुवातील एक एप्रिल रोजी शहराचा पारा ३८.० अंश सेल्सिअसवर होता. त्यानंतर काही दिवसांतच शहराच्या तापमानाने चढता क्रम धरला. या दोन आठवड्यांपासून शहराचे तापमान ४० ते ४१.०८ अंश दरम्यान कायम आहे. सूर्य चांगलाच तळपू लागल्याने अंगाची लाही लाही होत आहे. मागील चार दिवसांपूर्वी म्हणजे बुधवारी शहराचे कमाल तापमान ४१.० अंश सेल्सिअसवर होते.

गुरुवारी कमाल तापमान ४१.०२ अंशांपर्यंत वाढले. तर शुक्रवारी ४१.०६ अंश सेल्सिअस होते. शनिवारी पारा ४१.०८ अंश सेल्सिअसच्या उच्चांकावर पोहोचला. त्यातच जुन्या शहरातील अनेक भागात वीज कंपनीकडून देखभाल-दुरुस्तीसाठी वीजपुरवठा सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी ३ पर्यंत खंडित केला होता. त्यामुळे या भागातील नागरिकांना उन्हाचा त्रास अधिकच जाणवला.

बाहेर उन्हाचे चटके आणि घरात घामाच्या धारा अशा बिकट परिस्थितीमुळे इथले रहिवासी, दुकानदार आणि ग्राहकांचाही जीव कासावीस झाला. इतरही भागात दिवसभर उन्हाचे चटके आणि उकाड्यानेही शहरवासीयांना हैराण केले. दरम्यान, पुढील काही दिवस असेच उष्ण वातावरण राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. तर डॉक्टरांनी उन्हापासून काळजीचा सल्ला दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT