हर्सूल तलाव  pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Harsul Lake Water Level : हर्सूल तलाव तळ गाठण्याच्या मार्गावर

पाणीपातळी अवघ्या आठ फुटांवर : जुन्या शहराला पाणीपुरवठ्याचे मनपासमोर आव्हान

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : अपुऱ्या पावसामुळे हर्मूल तलाव तळ गाठण्याच्या मार्गावर असून तलावाचा पाणीसाठा घटून अवघ्या आठ फुटांवर आला आहे. या तलावावर अवलंबून असलेल्या जुन्या शहरासह हडको परिसरातील १६ वॉर्डावर जलसंकटाचे सावट निर्माण झाले आहे. तलावातील पाणी संपण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था उभी करणे आवश्यक असून नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत उभारण्यात आलेला दिल्लीगेट जलकुंभ अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेला नाही. त्यामुळे जलकुंभ हस्तांतरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

हर्सूल तलावाची पाणी साठवण क्षमता २९ फूट आहे. यंदा कमी पाऊस झाल्याने तलावातील पाण्याची पातळी केवळ १६ ते १८ फुटांपर्यंत पोहोचली होती. आता हा साठा आणखी घटून आठ फुटांवर आला आहे. तलावातील पाण्यावर प्रक्रिया करून जुन्या शहरासह हडको आणि अन्य परिसरांना पाणीपुरवठा केला जातो. या भागांत महापालिकेकडून पाच ते आठ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्याचा पाणी साठा पाहता आगामी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे महापालिकेसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हर्सूल तलावातील पाणीसाठा संपण्यापूर्वी शहागंज येथील जलकुंभातून दिल्लीगेटच्या जलकुंभात पाणी आणून ते संबंधित भागांना वितरित करण्याचे नियोजन आहे. मात्र, नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने दिल्लीगेट जलकुंभाचे काम पूर्ण केले आहे. मात्र, अद्याप हा जलकुंभ महापालिकेकडे हस्तांतरित झालेला नाही. या प्रक्रियेसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे.

या जलकुभाच्या हस्तांतरणास विलंब झाल्यास १६ वॉर्डातील पाणीपुरवठ्याचे नियोजन अडचणीत येऊ शकते. दिवाळीच्या काळात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास नागरिकांची गैरसोय वाढण्याची भीती आहे. तसेच हर्सूल तलावातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांच्या तक्रारी आहेत.

नळाला सुरुवातीला अर्धा तास मातीच्या रंगाचे पाणी येते, तर तीन ते चार दिवसांनंतर पाण्यात जंतू तयार होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे संबंधित वॉर्डातील नागरिक नगरसेवकांकडे हर्मूल तलावाऐवजी जायकवाडी धरणाचे पाणी देण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे दिल्लीगेट जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर शुद्ध पाणी मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.

दिल्लीगेट जलकुंभाकडे लक्ष

हर्सूल तलाव तळ गाठत असून दिल्लीगेटजलकुंभ महापालिकेच्या ताब्यात येणे आवश्यक आहे. शहागंज जलकुंभातून दिल्लीगेटपर्यंत पाणी आणून वितरण करण्याचे नियोजन आहे. मात्र, हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने जलकुंभ कार्यान्वित होण्याची प्रतीक्षा आहे.

हर्सूलचा पाणीसाठा आठ फुटांवर

हसूल तलावाची क्षमता २९ फूट असून, यंदा कमी पावसामुळे पाणीसाठा अपेक्षेइतका वाढला नाही. सध्या तलावात केवळ आठ फूट पाणी शिल्लक आहे. याच पाण्यावर जुन्या शहरासह हडको परिसरातील १६ वॉर्डाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.

१४०० च्या जलवाहिनीची दुरुस्ती भाऊबीजेनंतर रेल्वेस्थानकाजवळील १,४०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतील गळती थांबविण्यासाठी शटडाऊन घेण्याचे नियोजन आहे. मात्र, वाहतुकीची समस्या आणि दिवाळीपूर्वी शटडाऊन घेणे शक्य नसल्याने भाऊबीजेनंतरच हे काम केले जाणार आहे.
दत्तात्रय गायकवाड कार्यकारी अभियंता, मनपा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT