Crime News  pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : भर चौकात गोळीबार अन् चाकू हल्ला; गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक संपला?

पुंडलिकनगरात गँगवारप्रकरणी आठ गुन्हेगार गजाआड; खबऱ्यांचे नेटवर्क कमकुवत; जुने अधिकारी प्रवाहाबाहेर

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहरात गुन्हेगारांचे धाडस इतके वाढले आहे की, त्यांना आता कायद्याचा कोणताही उरलेला पुंडलिक धाक नाही. नगर परिसरातील अत्यंत वर्दळीच्या हनुमान चौकात गुरुवार (दि. १६) रात्री गैंगवारचा भडका उडाला. दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत भर चौकात चाकू हल्ला आणि गोळीबार झाला. भर चौकात गोळीबार करण्याची हिंमत या गुन् हेगारांमध्ये येतेच कशी? आणि गुन् हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

दरम्यान, पळून गेलेला गुंड पवन दिवेकरला पुंडलिकनगर ठाण्याचे उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांच्या पैठणगेट येथून बेड्या ठोकल्या. त्याला पकडताना राऊत हे जखमी झाले असून त्यांना पायाला गंभीर मार लागला.

पहिल्या फिर्यादीनुसार, नीलेश ऊर्फ सूर्या रांजणे याला पवन दिवेकर याने फोन करून बोलावून घेतले. हनुमान चौकात पवन आणि त्याचे साथीदार कुणाल साळवे, रोहन दिवेकर, सिद्धार्थ चाबुकस्वार, सतीश हिवराळे यांनी येथे फक्त आमचीच चालते अशी आरडाओरड करत नीलेशला बेदम मारहाण केली. यावेळी पवन दिवेकर याने आपल्या कमरेची बंदूक काढून हवेत एक गोळी झाडली आणि दुसरी गोळी नीलेशच्या दिशेने फायर करत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.

दुसऱ्या बाजूने कुणाल साळवे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, हनुमान चौकात वाद सुरू असताना निलेश रांजणे आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केला नीलेशने कुणालच्या पाठीवर चाकूने सपासप वार केले. यावेळी निलेश रांजणे आणि पवन दिवेकर या दोघांनीही आपापल्या बंदुका काढून एकमेकांवर रोखल्या होत्या, त्याचदरम्यान गोळीबार झाला. या जीवघेण्या थरारामुळे आजूबाजूचे दुकानदार आणि नागरिक जीव वाचवून पळत सुटले. साळवे आणि रांजणे दोघांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोन्ही गैंगविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस स्वतः एक गुन्हा दाखल करणार आहेत.

दिवेकरचा थरारक पाठलाग, पीएसआय राऊत जखमी

हनुमान नगर चौकात गोळीबार केल्यानंतर गुंड पवन दिवेकर पसार झाला. तो मध्यरात्री महावीर चौकात गेला. तिथे त्याचा मित्र भावसिंगपुऱ्यातील कुख्यात शिर्केला भेटला. त्याच्याकडून काही रक्कम घेऊन तो पैठणगेटच्या दिशेने गेला. पुंडलिकनगर ठाण्याचे उपनिरीक्षक अर्जुन राऊत, सुनील म्हस्के, प्रकाश डोंगरे, संदीप बीडकर, अजय कांबळे यांच्या पथकाने शोध सुरू केला. इकडे पुंडलिकनगर पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवित दिवेकर आणि रांजणे गंगच्या सात जणांना उचलले. पहाटे चार वाजेच्या सुमारास पैठणगेट येथे चहाच्या टपरीवर दिवेकर गेल्याचे कळताच राऊत यांच्या पथकाने त्याच्यावर झडप घातली. मात्र तो गल्लीबोळात पळत सुटला. पाठलाग करताना उपनिरीक्षक राऊत हे पडल्याने त्यांच्या पायाला गंभीर मार लागला. मात्र त्याही परिस्थितीत त्यांनी पथकासह दिवेकरच्या मुसक्या आवळल्या.

नागरिकांना आठवला अमितेश कुमारांचा काळ...

शहरातील सध्याची बिघडलेली कायदा व सुव्यवस्था पाहून नागरिकांना तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळाची आठवण येत आहे. त्या काळात गुन्हेगार, टवाळखोर आणि हेडछाड करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी चार्ली पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाकडून भर रस्त्यात गुन्हेगारांची अक्षरशः यथेच्छ धुलाई केली जायची. त्यावेळी खाकी बर्दीला पाहून गुन्हेगारांची गाळण उडायची. आज मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही. गुन्हेगारच पोलिसांना भारी पडत असल्याची उघड चर्चा आता चहाच्या टपऱ्यांपासून ते चौकाचौकांत ऐकायला मिळत आहे. बरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या वाढत्या गंगवारची गंभीर दखल न घेतल्यास शहराचे बिहार व्हायला वेळ लागणार नाही.

दोन्ही गँगच्या आठ गुन्हेगारांना तीन दिवसांची पोलिस कोठडी

पवन अनिल दिवेकर (३०), रोहन अनिल दिवेकर (२४, दोघेही या. एमएसई वी क्वार्टर, मिलकॉर्नर), कुणाल किशोर साळवे (२६, रा. न्यायनगर), महेश गौतम साळवे (३०, रा. संसार नगर), सतीश अण्णाराव हिवराळे (२३, रा. समतानगर), सिद्धार्थ शाहू चाबुकस्वार (२१, न्यायनगर) यांच्यासह दुसऱ्या गटातील नीलेश ऊर्फ सूर्या रांजणे (रा. न्यायनगर), आकाश साळुंखे (रा. हनुमाननगर) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकावर गुन्हे दाखल केले आहेत. दिवेकरला चार दिवस तर अन्य आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली. पुढील तपास पीएसआय म्हात्रे आणि पीएसआय भालेराव करत आहेत.

पोलिसांचे नेटवर्क फेल; रेकॉर्डवरील गुन्हेगार मोकाट

पुंडलिक नगरसारख्या गजबजलेल्या भागात गोळीबार होणे हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. सध्या पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क पूर्णपणे कमकुवत झाल्याचे चित्र आहे. गुन्हेगारीची नस ओळखणारे, शहरातील गल्लीबोळांची माहिती असणारे जुने आणि अनुभवी अधिकारी-कर्मचारी सच्या प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले आहेत. त्यामुळे पोलिसांचे इन्टेलीजन्स पूर्वीप्रमाणे राहिलेले नाही. रेकॉर्डवरील गुन्हेगार शहरात खुलेआम मोकाट फिरत आहेत आणि पोलिसांना घटना घडण्यापूर्वी त्याची साधी भनकही लागत नाही हे विशेष.

पोलिसांकडून लाड : एका हातात हातकडी, दुसऱ्या हातात सिगारेट

कुख्यात गुन्हेगारांचे पोलिस कशाप्रकारे लाड पुरवितात याचा प्रत्यय गुंड पवन दिवेकरचा हा फोटो पाहून येईल. त्याला गतवर्षी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच आवारात हातात हातकडी असताना तो सिगारेटचे कश मारत होता. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दुसरीकडे गुंडगिरीचे सोशल मीडियावर उदात्तीकरण सुरू असताना पोलिसांना गुन्हेगारांचे सोशल मीडियाचे अकाउंट दिसत नाही का? ते डोळे झाकून बसले आहे? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत

दिवेकर, रांजणे टोळीवर मोक्का लावणार - पुंडलिकनगर गोळीबार प्रकरणातील आरोपी अटक केले आहे. त्यांचा आपसात मिरवणुकीत वाद झाल्याने हा प्रकार घडला. मात्र, त्यांच्यावर गंभीर कलम लावले आहेत. एमपीडीए आणि मोक्काही लावणार. गेल्या पाच वर्षातील रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांचा कोम्बिंग ऑपरेशन राबवून शोध घेतला जात आहे. कोणाचीही गय केली जाणार नाही.
प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT