Sambhajinagar News : कामगार चौकात पुन्हा खोदकाम file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : कामगार चौकात पुन्हा खोदकाम

जलवाहिनी जोडणी : 'त्या' दीड महिन्याच्या कामावर प्रश्न; २० फूट खड्ड्यासाठी मुख्य मार्ग पुन्हा बंद

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Excavation work resumes at Kamgar Chowk

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामामुळे सिडको एन-३ ते कामगार चौक हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा विस्कळीत झाला आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी आधीच दीड महिना रस्ता पूर्णपणे बंद ठेवून जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले होते. मात्र त्या कामातील तांत्रिक त्रुटीमुळे आता पुन्हा याच ठिकाणी सुमारे २० फूट खोल खड्डा खोदण्यात आल्याने नागरिक आणि वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

केंद्र सरकारच्या अमृत-२ पेयजल योजनेअंतर्गत शहरात सुमारे २,७४० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. जायकवाडी ते शहरादरम्यान मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर, आता विविध भागांतील जलकुंभांपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी अंतर्गत वितरण वाहिन्यांचे जाळे उभारले जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या देखरेखीखाली 'जीव्हीपीआर' कंपनीमार्फत हे काम सुरू आहे.

या योजनेनुसार कामगार चौक परिसरात जलवाहिनी जोडणीसाठी (जंक्शन जोडणे) दीड महिन्याहून अधिक काळ रस्ता अंशतः बंद ठेवण्यात आला होता. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा त्रास सहन करत काम पूर्ण होण्याची वाट पाहिली. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर जोडणीमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी आढळल्याने, आता पुन्हा मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून भलामोठा खड्डा खोदण्यात आला आहे.

या दुसऱ्या खोदकामामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे (हायकोर्ट) जाणारा मुख्य मार्ग पुन्हा बंद करण्यात आला आहे. यामुळे पर्यायी मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला असून, दररोज सकाळी आणि सायंकाळी कामगार चौकात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा मोठा फटका बसत आहे.

चूक कुणाची, त्रास आम्हाला !

"दीड महिना रस्ता बंद ठेवून काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, अधिकाऱ्यांच्या नियोजनातील त्रुटी आणि कामावरील नियंत्रणाचा अभाव यामुळे नागरिकांना पुन्हा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे," अशी भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, जलवाहिनीचे हे काम अंतिम टप्प्यात असून आवश्यक दुरुस्तीनंतर मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असा दावा संबंधित यंत्रणेकडून करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT