जे. ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर : इंधनाचे वाढते दर त्याचबरोबर बी-६ वाहनांच्या वाढत्या किमती पाहता आता वाहनधारक ई-वाहनांना पसंती देत आहेत. आज घडीला जिल्ह्यात ३५ हजार २७० वाहने आहेत. यांच्या तुलनेत जिल्ह्यात चार्जिंग आणि बॅटरी स्वॅपिंग सेंटर मात्र केवळ ६१ आहेत. चार्जिंग सेंटर वाहनांच्या तुलनेत कमी असल्याने अनेक वाहनधारक घरीच वाहन चार्ज करून वेळ मारून नेत आहेत. ही अडचण पाहता अनेक जण ई-वाहनांसाठी वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.
दिवसेंदिवस दुचाकींसह चारचाकी वाहनांच्या वापरात वाढ होत आहे. इंधनाचे दर आकाशाला भिडल्याने अनेकांनी नवीन वाहनांकडे पाठ फिरवली आहे. असे असले तरी कमी पैशात जास्त अंतर कापणाऱ्या ई-वाहनांला मात्र वाहनधारकांकडून प्रथम पसंती मिळत आहे. मात्र चार्जिंग सुविधा शहरासह जिल्ह्यात पुरेशी नसल्याने सध्यातरी ई-वाहनांचा ओघ कमी आहे. ज्या वाहनधारकांनी वाहने खरेदी केली आहे, ते सध्या घरगुती चार्जिंगवरच भागवत आहेत. आरटीओच्या नोंदीनुसार जिल्ह्यात ३५ हजार २७० ई-वाहने आहेत. यात दुचाकी, स्कूटर, मोपेड, कार, ट्रेलर व इतर वाहनांचा समावेश आहे.
जिल्ह्यात ६१ चार्जिंगसह स्वॅपिंग सेंटर
ई-वाहने बाजारात दाखल झाली, परंतु त्यांच्या चार्जिंगची सुविधा अद्यापही म्हणावी तेवढी नाही. महावितरणने पुढाकार चार्जिंग सेंटर उभारण्याचे काम हाती घेतले आहे. तर काही पेट्रोल पंपचालक काही खासगी नागरिकांनी हे केंद्र उभे केले आहेत. याची संख्या जिल्ह्यात केवळ २० असल्याने अद्यापही वाहनधारक याचा लाभ घेण्यापासून दूरच आहेत. चार्जिंग सेंटरची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे मत वाहन विक्रेत्यांनी व्यक्त केले.
वेट अॅण्ड वॉचची भूमिका
अनेक ग्राहक ई-वाहनांची विचारणा करतात, त्याचबरोबर चार्जिंग सेंटरचीही माहिती विचारतात. ई-वाहनांना मागणी मोठ्या प्रमाणात आहे, परंतु शहरात चार्जिंग सेंटरची व्यवस्था नसल्याने अनेकांनी सुविधा उपलब्ध झाल्यावर वाहन घेऊ, अशी मानसिकता बनवली आहे. अनेकांनी चार्जिंग सेंटरसाठी महावितरणकडे मागणी केली असून, यात भर पडताच वाहनांची मागणी वाढण्याची शक्यता ई-वाहन विक्रेत्यांनी केली आहे.