मनपा पथकाने सेव्हनहिल ते दर्गा चौक या डीपी रस्त्यावरील सर्व अतिक्रमण हटवली. याची पाहणी करताना आयुक्त अमोल येडगे यांच्यासह विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे, सहाय्यक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar encroachment removal drive : महापालिकेची धडक मोहीम; 144 अतिक्रमणावर कारवाई

सेव्हनहिल ते शहानुरमिया दर्गा चौक मार्ग मोकळा : अन्य भागांतील कारवाईकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने अतिक्रमणांविरोधात व्यापक मोहीम राबवत बुधवारी (दि.२९) दिवसभरात तब्बल १४४ अतिक्रमणे हटविली. सेव्हनहिलपासून विभागीय क्रीडासंकुलामार्गे शहानुरमिया दर्गा चौकापर्यंतच्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. वाहतुकीस अडथळा ठरणारी विविध प्रकारची बांधकामे पाडत मोठ्या पोलिस बंदोबस्तात विकास आराखड्यातील (डीपी) रस्ता मोकळा केला. पथकाने या मार्गावर कारवाई केल्याने शहरातील अन्य डीपी रस्त्यांवरील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडलगतच्या सेव्हनहिल ते गजानन मंदिर चौक यासह सूतगिरणी ते शाहनूरमिया दर्गा चौक मार्गावरील फूटपाथ व रस्त्यालगत अनधिकृत शेड, बांधकामे तसेच व्यावसायिक अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले होते. दरम्यान, अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या मार्गांवर व्यापक मोहीम राबवली.

पथकाने सकाळी दहाच्या सुमारास सेव्हनहिल परिसरातून कारवाईला प्रारंभ केला. या दरम्यान टपऱ्या, शेड, फुटपाथवरील जाहिरात फलक तसेच लोखंडी कमानी हटविण्यात आल्या. स्वीट मार्ट, रसवंतीगृहे, गॅरेज, शोरूम व हॉटेल्ससमोरील अनधिकृत बांधकामांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. या मोहिमेत फुटपाथलगतच्या झाडे विक्रीच्या स्टॉल्सवरही कारवाई करत कुंड्या व माठ हटविण्यात आले. याशिवाय फळ व भाजीपाला विक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या.

यासह बसथांब्यावर आश्रय घेतलेल्या एका व्यक्तीलाही तेथून हटविण्यात आले. मात्र सेव्हनहिल परिसरातील मोठ्या शोरूमसमोरील अतिक्रमण हटवताना काही वकिलांनी न्यायालयीन आदेश असल्याचा दावा करत आक्षेप घेतला. तसेच बांधकामांवर कारवाई का केली, असा प्रश्न उपस्थित केला. मात्र डीपी आराखड्यानुसारच कारवाई होत असल्याचे स्पष्ट करून पथकाने मोहीम सुरूच ठेवली. या कारवाईत समन्वयक संजय सुरडकर यांच्यासह मनपाचे कर्मचारी, नागरी मित्र पथक आणि पोलिस अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

डीपी आराखड्यानुसारच कारवाई

सेव्हनहिल ते सूतगिरणी चौकादरम्यान रस्ता दुभाजकालगत दोन्ही बाजूंनी प्रत्येकी १५ फूट, असे एकूण ३० फूट रस्त्याचे नियोजन विकास आराखड्यात आहे. त्यानुसारच अतिक्रमण हटविण्यात आले, अशी माहिती संतोष वाहुळे यांनी दिली. तसेच अतिक्रमणधारकांना यापूर्वी नोटीस देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने कारवाई करावी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्तांकडून पाहणी, कारवाईला बळ

या कारवाईदरम्यान मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी प्रत्यक्षस्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवत अतिक्रमणधारकांविरोधात कठोर भूमिका घेण्याच्या सूचना दिल्या.

मोहीम सुरूच राहाणार

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अतिक्रमणविरोधी मोहीम यापुढेही सुरू राहणार असून, उर्वरित चार मार्गांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पोलिस प्रशासन व नगरसेवकांचेही सहकार्य घेतले जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT