Chhatrapati Sambhajinagar | प्लास्टिकवर मनपाचा दुहेरी प्रहार

कार्यालयांत प्लास्टिक बंदी, तर शहरात साडेचार टन साठा जप्त
Chhatrapati Sambhajinagar | प्लास्टिकवर मनपाचा दुहेरी प्रहार
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या निर्धारातून महानगरपालिकेने आता दुहेरी धडक मोहीम हाती घेतली आहे. एकीकडे प्रशासनाने स्वतःपासून सुरुवात करत मनपाच्या सर्व कार्यालयांमध्ये प्लास्टिक बंदीचे सक्तीचे आदेश लागू केले आहेत; तर दुसरीकडे शहरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत तब्बल साडेचार टन (४ टन ६३० किलो) प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे. या कारवाईमुळे शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्लास्टिकच्या सर्रास वापरावरून प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर आयुक्त अमोल येडगे यांनी तातडीने पावले उचलत मनपा मुख्यालय, सर्व झोन कार्यालये, आरोग्य केंद्रे आणि शाळांमध्ये प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

यापुढे पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिक बाटल्यांऐवजी धातू किंवा काचेच्या बाटल्या वापरणे बंधनकारक असेल. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर टाळून १० ते २० लिटरचे पाण्याचे जार वापरावेत, तसेच कार्यालयीन बैठका व पाहुण्यांच्या स्वागतासाठी केवळ पर्यावरणपूरक पर्यायांचाच अवलंब करावा, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

अंगुरीबाग, मोतीकारंजात कारवाईचा धडाका बुधवारी पाच टन प्लास्टिक जप्त केल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या नागरी मित्र पथकाने गुरुवारी (दि. २३) अंगुरीबाग व मोतीकारंजा परिसरात अचानक छापे टाकले. या कारवाईत गंगवाल प्लास्टिक, एस. के. प्लास्टिक (संजय कटार) आणि एस. पी. प्लास्टिक या तीन दुकानांमधून ४ टन ६३० किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात आले. या तिन्ही विक्रेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा (एकूण ७५ हजार रुपये) दंड ठोठावण्यात आला. मागील दोन दिवसांत मनपाने तब्बल १० टनांहून अधिक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले असून, त्याची विल्हेवाट लावली जात आहे. सहायक आयुक्त रमेश मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

फौजदारी कारवाईचा इशारा "प्लास्टिकमुक्त शहरासाठी महापालिका झिरो टॉलरन्स धोरण राबवत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. व्यापारी व नागरिकांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि साठा तात्काळ थांबवावा; अन्यथा सतीसह थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील."

- अमोल येडगे, मनपा आयुक्त

प्लास्टिक असोसिएशनची सहकार्याची तयारी

या धडक कारवाईनंतर प्लास्टिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांची भेट घेतली. शहरात प्रतिबंधित प्लास्टिक अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असे उपायुक्तांनी ठणकावून सांगितले. यावर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही मनपाला या मोहिमेत पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

पदाधिकाऱ्यांकडून पथकाचे कौतुक

सलग दुसऱ्या दिवशी मनपाच्या पथकाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे मनपा वर्तुळात स्वागत होत आहे. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये आणि विरोधी पक्षनेते अब्दुल समीर सय्यद यांनी कारवाई करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि नागरी मित्र पथकाचे विशेष कौतुक केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news