Sambhajinagar Encroachment Campaign
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शहरातील प्रमुख रस्त्यांसह सर्व्हिस रोड ६० मीटर रुंदीचा आहे. यादरम्यान असलेली बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली असून आतापर्यंत चार रस्त्यांवर ३१९५ पक्की बांधकामे भुईसपाट केली आहेत.
यात ४ ते ५ मजल्यांच्या इमारतीदेखील जमीनदोस्त केल्याने मालमत्ताधारकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे सिडको बसस्थानक ते हसूल आणि दिल्लीगेट ते हसूल या रस्त्यावर सोमवारी कारवाई होणार, अशी अनाऊन्समेंट होताच अतिक्रमणधारकांनी स्वतःहून बेकायदा बांधकाम काढणे सुरू केले आहे. सुमारे अर्ध्याहून अधिक रस्ता मोकळा झाला आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत व पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी संयुक्तरीत्या मोहीम राबवून ६० मीटर रुंदीतील अतिक्रमण व बेकायदा बांधकामांची पाडापाडी करीत आहे. बीड बायपास रस्त्यापासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेनंतर जालना रोड, पैठण रोड, दौलताबाद रोड आणि आता सोमवारी जळगाव रोडवर मोहीम राबविण्यात येणार आहे. यात केवळ दोन मजलीच नव्हे तर तीन, चार आणि पाच मजली इमारती टोलेजंग बेकायदा इमारती अगदी भूकंपाप्रमाणे होत्याच्या नव्हत्या झाल्या.
प्रशासनाच्या या धडक कारवाईने शहरातील बेकायदा बांधकाम करणाऱ्या मालमत्ताधारकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे सिडको बसस्थानक ते हर्सल आणि हर्सल ते दिल्लीगेट या रस्त्यावर महापालिकेने सोमवारपासून कारवाई होणार अशी केवळ घोषणाच केली. तर येथील मालमत्ताधारकांनी स्वतःहून ६० मीटर रुंदीत येणारी आपापली बेकायदा बांधकामे काढून घेणे सुरू केले आहे. त्यामुळे सोमवारी दिल्लीगेट ते हसूल टी पॉइंट अशी मोहीम सुरू केली जाईल, असे अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे यांनी सांगितले.
एमआयडीसीकडून मोजणीला सुरुवात जालना रोडवर अनधिकृत बांधकाम निष्काषित करण्याची मोहीम सुरू आहे. या अनुषंगाने एमआयडीसीकडून सिडको ते चिकलठाणापर्यंतच्या जागेची मोजणी करण्यात येत आहे. काल सिडको चौकापर्यंत रोडच्या एका बाजूची मोजणी करण्यात आली. दुसऱ्या बाजूची मोजणी दोन दिवसांत केली जाईल, अशी माहिती एमआयडीसी प्रादेशिक अधिकाऱ्यांकडन देण्यात आली.
महापालिकेने सव्हिस रोडमध्ये येणार बेकायदा बांधकामे पाडण्यास सुरुवात केली आहे. यात जालना रोडवर केंब्रीज ते एपीआय कॉर्नरपर्यंत मोहीम झाली. आतापुढे एपीआय ते सेव्हनहिल ६० मीटर आणि सेव्हनहिल ते बाबा पंप ४५ मीटर रुंदीतील अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकाम पाडली जाईल, असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी जाहीर केले आहे.
हसूल ते दिल्लीगेट या रस्त्यावर महापालिका सोमवारी कारवाई सुरू करेल. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असून तो दोन्ही बाजूने ४५ मीटर रुंदीचा आहे. परंतु, दिल्लीगेट ते हसूल कारागृहापर्यंतच या रस्त्यावर दोन्ही बाजूने सुमारे ४५० हून अधिक अतिक्रमण आहेत.