Sambhajinagar Encroachment Campaign : मनपाचा गरिबांवर हातोडा, धनदांडग्यांसमोर नांग्या File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Encroachment Campaign : मनपाचा गरिबांवर हातोडा, धनदांडग्यांसमोर नांग्या

सेव्हनहिल-केंब्रीज सर्व्हिस रोडची कारवाई अर्धवट, अनधिकृत नावाखाली टार्गेट

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Encroachment Campaign Municipal Corporation's hammer on the poor, the wealthy are safe

अमित मोरे

छत्रपती संभाजीनगर : शहराची लाईफलाईन असलेला जालना रोड नियमानुसार सेव्हन हिलपासून केंब्रीज शाळेपर्यंत दोन्ही बाजूने ६० मीटर रुंद करण्यात येईल. यात दोन्ही बाजूला १२-१२ मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड असेल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला. परंतु, केंब्रीज चौकातून सिडको चौकात येताच पथकाने मोहीम गुंडाळली.

यानंतरच्या पंचतारांकित हॉटेल्सला धक्का न लावता संपूर्ण यंत्रणा सोमवारी पैठण रस्त्यावर नेत धनदांडग्यांसमोर नांग्या टाकल्याचा प्रकार पुढे आला आहे. तेव्हा ६० मीटर रुंदीचे नियम केवळ गरिबांची घरे, दुकाने आणि व्यवसाय नेस्तनाबूत करण्यासाठीच आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

शहराचे मुख्य प्रवेशद्वार सुसज्ज करून भविष्यात वाहतुकीबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी शहरातील बाबा पेट्रोल पंप ते केंब्रीज शाळा चौक, छावणी ते दौलताबाद टी पाइंट, सिडको बसस्थानक ते हसूल गाव आणि महानुभव आश्रम चौक ते नक्षत्रवाडीतील टोल नाका त्यासोबतच महानुभव आश्रम ते झाल्टा फाटा हे रस्ते ६०-६० मीटर रुंदीचे केले जाणार आहेत.

शहर विकास आराखड्याप्रमाणे रस्त्यांची रुंदी निश्चित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. महापालिका अस्तित्वात येण्याच्या पूर्वीपासून हे रस्ते ६० मीटर रुंदीचे आहेत, असा दावा देखील काही अधिकाऱ्यांनी केला आहे. महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांच्या दाव्यानुसार सेव्हनहिल ते केंब्रीज शाळाचौकपर्यंत दोन्ही बाजूने सर्व्हिस रोडची जागा मोकळी केली जाणार होती.

दरम्यान, महापालिकेने या मोहिमेचा मोठा गाजावाजा केला. परंतु, जसे पथक केंब्रीजपासून एपीआय कॉर्नरला आले. तसे प्रशासनाने कारवाईला ब्रेक देत पथकाला पैठण रस्त्यावर वळण्याचे आदेश दिले. त्यावरून सोमवारी (दि. ३०) पथकाने महानुभव आश्रम ते नक्षत्रवाडी या मार्गावर अनेकांना बेघर आणि बेरोजगार करण्याचा सपाटाच सुरू केल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

अनधिकृत बांधकामाच्या नावाखाली प्रशासन नियमबाह्यरीत्या कारवाई करीत आहे. जेथे अडचणी येतील, त्या मिळकीतींकडे प्रशासन सपशेल कानाडोळा करीत आहे. यात पंचतारांकित हॉटेल्सला असो की, मग पैठण रोडवरील महानुभव आश्रमलगतचे बांधकाम असो. यावर बुलडोझर चालवण्याचे धाडस प्रशासकांच्या टीमने दाखवले नाही. त्यामुळे या कारवाईवरच संशय व्यक्त होत आहे.

काय म्हणतो नियम : संविधानाच्या अनुछेद ३०० अ नुसार मालकीच्या मालमत्तेचा उपभोग घेणे हे मालमत्ताधारकाचा अधिकार आहे. त्यानुसार एखाद्याने आपल्या खासगी जागेत अनधिकृत बांधकाम केले असेल. तर (मग ती जागा गावठाणात असो की, गावठाणा बाहेर असो.) ते बांधकाम पाडण्यापूर्वी महापालिकेलाच काय तर इतर सर्वप्रकारच्या अॅथॉरिटीला (तुमचे बांधकाम अनधिकृत आहे, ते का पाडण्यात येऊ नये.) अशी १५ दिवस मुदतीची नोटीस संबंधित मालमत्ताधारकाला द्यावीच लागते. हे कायद्यानुसार बंधनकारक आहे.

त्यानंतर तो मालमत्ताधारक महापालिकेकडे येऊन रीतसर बांधकाम परवानगीची मागणी करू शकतो. एवढेच काय, तर अशा खासगी जागेतील अनधिकृत बांधकाम जर रस्त्यासाठी असो की, इतर कुठल्याही सरकारी कामासाठी भूसंपादन करायचे असेल तर त्यासाठी रीतसर नोटीस देणे, त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया राबविणे, आवश्यक असते.
-जयंत खरवडकर, सेवानिवृत्त सहायक संचालक, नगररचना विभाग

मनपा की रझाकार

महापालिकेने नियम धाब्यावर बसून चिकलठाणा, पैठण रस्त्यावर कारवाई केली आहे. एकीकडे खंडपीठच्या आदे-शात १५ ऑगस्टपर्यंत घरे पाडली जाऊ नये, असे स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे महापालिका स्वतःच घरांवर बुलडोझर चालवीत आहे. रझाकाराच्या काळातही अशी घरे पाडली जात नव्हती. तशी घरे ऐन पावसाळ्यात पाडली आहे.

गावठाणात कारवाई अशक्य

चिकलठाणा हा परिसर जुन्या गावठाणात मोडतो. येथील जुनी बांधकाम पाडताना त्यांना नोटीस देणे, रीतसर भूसंपादन करून घेणे आणि त्यानंतर कारवाई करणे आवश्यक होते. परंतु, प्रशासनाने सिनेस्टाईल नोटीस न देताच कारवाई केली. नियमांना पूर्णतः धाब्यावर बसवले.

मनपानेच दिली ६० मीटरमध्ये परवानगी

जालना रोड सेव्हनहिल ते केंब्रीजपर्यंत ६० मीटर रुंदीचा आहे, असा दावा जर महापालिका करीत आहे. तर महापालिकेनेच या मार्गावरील मालमत्तांनाच काय तर पैठण रस्त्यावरील महानुभव आश्रमालगतच्या बांधकामांना ६० मीटर आतपर्यंत बांधकाम परवानगी दिलीच कशी, यात दोषी कोण?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT