Sambhajinagar Encroachment campaign Marking on Pump-Delhigate road
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने पडेगाव, पैठण रोड, बीड बायपास, जळगाव आणि जालना रोड या प्रमुख पाच रस्त्यांसोबतच अंतर्गत रस्त्यांकडेही लक्ष केंद्रित केले आहे. विकास आराखड्यात मंजूर असल्याप्रमाणे रस्त्यांवर मार्किंग करून बाधित मालमत्ता काढण्यात येत आहेत. यात चंपा चौक ते जालना रोड मोजणीला विरोध झाल्यानंतर शुक्रवारी (दि.१८) महापालिकेच्या पथकाने बाबा पंप ते दिल्लीगेट रस्त्यावर मोजणीसह मार्किंगचे काम सुरू असून, या ३५ मीटरच्या रस्त्यात २०० हून अधिक मालमत्ता बाधित होण्याची शक्यता आहे.
महापालिका प्रशासनाने २० जूनपासून शहरातील अनधिकृत बांधकामांवर बेधडकपणे बुलडोझरची कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत शहराच्या मुख्य प्रवेशद्वारांचा दबलेला श्वास मोकळा करण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने केला. परंतु मोहीम राबवताना प्रशासनाने गावठाण आणि झोपडपट्टीसह खासगी जागेतील बांधकामांवर नोटीस न देताच बुलडोझर चालवून मोठमोठ्या इमारती भुईसपाट केल्या. या कारवाईमुळे शहरातील रस्ते सुसज्ज आणि सुसाट होतील, अशी शक्यता व्यक्त केली गेली. परंतु धनदांडग्यांच्या मालमत्ता वाचवण्यासाठी ऐन कारवाईच्या शेवटच्या टप्प्यात प्रशासनाने परवानगी घेऊन बांधकाम केलेल्यांना मोहिमेतून सूट देण्याचा निर्णय घेतला.
महापालिका प्रशासनाच्या या निर्णयानंतर नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. त्यांचा वाढता रोष लक्षात घेत प्रशासनाने आता मोहिमेपूर्वी नोटीस देणे, किती बांधकाम बाधित होत आहेत, याची मोजणी करून मार्किंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यात बाधित होणाऱ्या मालमत्तांची मोजणी करून त्यावर मार्किंग करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी (दि. १८) पथकाने बाबा पेट्रोलपंप ते दिल्लीगेट या ३५ मीटर रुंदीच्या रस्त्यावर मोजणी करून मार्किंग केली. यात सुमारे २०० हून अधिक मालमत्ता बाधित होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. बहुतांश ठिकाणी हा रस्ता ३५ मीटरपेक्षा जास्त रुंद असल्याचे तर काही ठिकाणी रस्त्याची रुंदी ही ३२ ते ३४ मीटर एवढी असल्याचे मोजणीत कर्मचाऱ्यांना आढळले.
शहर विकास आराखड्यात असलेल्या १५, १८, २४, ३०, ३५, ३६ आणि ४० मीटर रुंदीच्या रस्त्यांवर महापालिका मार्किंग करणार आहे. त्यानंतर संबंधितांना नोटीस बजावून लागलीच कारवाईही करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेने शुक्रवारी बाबा पेट्रोलपंप ते दिल्लीगेट या ३५ मीटर रस्त्यावर बाधित होणाऱ्या मालमत्तांची मोजणी करून त्यावर मार्किंग केली. यासोबतच प्रशासनाकडून लागलीच बाधित मालमत्ताधारकांना नोटीस बजावून स्वतःहून बांधकाम काढून घेण्याची सूचना केली आहे.
चंपा चौक ते जालना रोडची रुंदी नवीन विकास आराखड्यात बदलण्यात आली आहे. हा अर्धा रस्ता ३० मीटर रुंदीचा आणि अर्धा १८ मीटर रुंदीचा आहे. त्यामुळे याबाबत खंडपीठात याचिका दाखल झाली असून, शासनाला शपथपत्र सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे तूर्तास या रस्त्याच्या संयुक्त मोजणीला ब्रेक लागला आहे.