Sambhajinagar Encroachment Campaign Demand of the citizens of Hasul: Met with the Municipal Commissioner
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा रस्त्यासाठी जागा घ्या, टीडीआर नको, रोख स्वरूपात मोबदला द्या, अशी मागणी करत हसूलमधील नागरिकांनी रविवारी (दि.१३) महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांची भेट घेतली. यावेळी ६० मीटरच्या आत येणारी अनधिकृत बांधकामे पाडणारच या भूमिकेवर मनपा आयुक्त ठाम असून, पाडापाडी केल्यानंतर मोकळ्या जागेचे भूसंपादन करताना जागेचा मोबदला देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. विजय औताडे, सुरेश औताडे, युनूस पटेल, अनिस पटेल, हरिभाऊ पहाडिया, गजानन टेहरे, शांतीलाल हरणे, संतोष फटागडे, कल्याण औताडे आदींची उपस्थिती होती.
हसूल गावातील रस्ता ६० मीटरसंदर्भात महापालिकेने शनिवारी (दि.१२) रात्री या परिसरात भोंगा फिरवला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. त्यावरून आज रविवारी दुपारी गावातील २५० नागरिकांनी आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेतली. या बैठकीत गावकऱ्यांनी विविध मागण्या केल्या. यात गावातील तीनशे वर्ष जुने हनुमान मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, जामा मशीद, कब्रस्तान बाधित होत आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्ये रस्ता रुंदीकरणात ९८ मालमत्ता पाडण्यात आल्या. आता रस्ता आणखी १०० फूट रुंद केला तर आमच्या सर्वच मालमत्ता जातील. आम्हाला जागाच शिल्लक राहणार नाही. आम्ही रस्त्यावर येऊ. त्यामुळे आम्हाला रोख, टीडीआर स्वरूपात मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, धार्मिक स्थळांना सध्या आम्ही हात लावणार नाही. धार्मिक स्थळांच्या बाबतीत गावकऱ्यांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.
राहिला प्रश्न अनधिकृत मालमत्तांचा तर त्या कोणत्याही परिस्थितीत पाडण्यात येतील निवासी मालमत्ता असेल तर त्याला १५ ऑगस्टपर्यंत हात लावला जाणार नाही. व्यावसायिक मालमत्ता कधीही पाडण्यात येतील. त्यापूर्वी मनपाचे कर्मचारी येतील व रीतसर मार्किंग करून देतील. त्यानंतर तुम्हाला मालमत्ता काढून घेण्यासाठी वेळही दिला जाईल, असे जी. श्रीकांत यांनी यावेळी सांगितले.
आज मनपा तुमची जागा ताब्यात घेत नाही. जेव्हा जागा ताब्यात घेतली जाईल, तेव्हा तुम्हाला मोबदलासुद्धा मिळेल. हा मोबदला टीडीआर स्वरूपात दिला जाईल, मनपाकडे पैसा नसल्यामुळे टीडीआर देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
पाडापाडीच्या कारवाईआधी मार्किंग करण्यात येईल, त्यानंतर अनधिकृत व्यावसायिक मालमत्ता कोणत्याही परिस्थितीत पाडण्यात येतील. त्यामुळे मार्किंगनंतर बांधकाम स्वतःहून काढून घेण्यास वेळ देण्यात येईल.
आधीच्या भूसंपादनामुळे आमच्याकडे थोडीफार जागा शिल्लक आहे. आता पुन्हा संपादन केल्यास आम्ही रस्त्यावर येऊ, भूमिहीन होऊ, त्यामुळे आधी आम्हाला जागेचा मोबदला द्यावा. आम्हाला टीडीआर नको, पैसे दिले तर दुसरीकडे घर घेता येईल. दुकान, व्यवसाय सुरू करता येईल, अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली.