Cyber Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Cyber Crime : क्वालिटी इन्चार्जला डिजिटल अरेस्ट करून १० लाखांची लूट

अटकेची धमकी ; पोलिस अन् ईडीचा बनाव; भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर: शहरात डिजिटल अरेस्ट करून ज्येष्ठ नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्य सायबर भामट्यांचे जाळे दिवसेंदिवस अधिक घातक रूप धारण करत आहे. चिकलठाणा एमआयडीसीतील एका कंपनीत गेली २७ वर्षे क्वालिटी इन्चार्ज म्हणून कार्यरत असलेल्या ६३ वर्षीय ज्येष्ठ अधिकाऱ्याला तब्बल नऊ दिवस डिजिटल अरेस्ट ठेवत, मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची व कुटुंबाला तुरुंगात पाठवण्याची धमकी देऊन तब्बल ९ लाख ९० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात रविवारी (दि.१) सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गारखेडा परिसरात राहणारे ६३ वर्षीय गृहस्थ यांच्या तक्रारीनुसार, ते पत्नीसह गारखेड्यात राहतात, तर त्यांची मुलगी बाहेर राज्यात नोकरीला आहे. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९:३२ वाजेच्या सुमारास त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला.

समोरील व्यक्तीने, नवी दिल्लीच्या दूरसंचार विभागातून बोलत असल्याचे सांगत तुमच्या मोबाईल नंबरवरून मुंबईत अनेक लोकांना धमक्यांचे फोन गेले असून, मुंबई पोलिसांत तुमच्याविरुद्ध १० ते १५ तक्रार अर्ज आले आहेत, असा दम भरला. मी असा कोणताही नंबर वापरत नाही आणि माझा यात काही संबंध नाही, असे वृद्धाने सांगताच, भामट्याने तुमच्या नावे परस्पर सिम कार्ड निघाले असून ऑनलाईन तक्रार नोंदवावी लागेल म्हणत व्हॉट्सअॅप कॉलवर येण्यास भाग पाडले.

एफडी-म्युच्युअल फंड मोडून ९ लाख ९० हजार उकळले

तुमच्या सर्व बँक खात्यांतील पैसे अधिकृत आहेत की नाही हे सिद्ध करण्यासाठी हे फंड सुप्रीम कोर्टाच्या पडताळणी खात्यात ट्रान्सफर करावे लागतील, कोर्टाकडून क्लिअरन्स मिळाल्यानंतर सर्व रक्कम २४ तासांत परत केली जाईल, अशी बतावणी भामट्यांनी केली. भीतीपोटी वृद्धाने पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यातील पैसे, एफडी आणि म्युच्युअल फंड मोडून ती सर्व रक्कम आपल्या बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी खात्यात जमा केली. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी सायबर भामट्यांनी दिलेल्या एस. के. जमशेद नावाच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर (श्रीकोना शाखा, आसाम) आरटीजीएसद्वारे रक्कम भरण्यास भाग पाडले. रक्कम पाठवल्यानंतरही भामट्यांनी आणखी पैशांची मागणी लावून धरल्याने वृद्धाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ पुंडलिकनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे करत आहेत.

व्हिडिओ कॉलवर तिरंगा, पोलिसांचे झेंडे अन् बनावट 'ईडी' लेटर

आरोपींनी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर केला. त्या व्हिडिओ कॉलवर समोरील अधिकाऱ्याच्या पाठीमागे तिरंगा, पोलिसांचा निळा झेंडा, अधिकृत दिसणारे टेबल आणि संगणक मांडलेले दिसत होते. त्यामुळे समोर खराखुरा वरिष्ठ पोलिस अधिकारी असल्याचे भासले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गाजलेल्या गोयल मनी लॉड्रिग प्रकरणात तुमचे नाव आले आहे. तुमच्या बँक खात्यांचा वापर देशविरोधी काळा पैसा फिरवण्यासाठी झाला असून तुमच्याविरुद्ध कोर्टान नॉन-बेलेबल वॉरंट काढले आहे. पोलिस तुमच्या घरी पोहोचून पत्नी व मुलीला उचलून घेऊन जाईल, तुमचे सर्व बँक अकाउंट गोठवले जातील, अशी धमकी दिली. या प्रकाराने वृद्ध प्रचंड हादरून गेले.

९ दिवस नजरकैद; कोणालाही सांगण्यास मज्जाव

वृद्धाला घाबरवून आरोपींनी त्यांना मदत करण्याचे नाटक केले. आम्ही सांगतो तसे सहकार्य केले तरच यातून वाचू शकाल, घरात कोणालाही काही सांगायचे नाही, अशी ताकीद दिली. २२ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या सलग नऊ दिवसांच्या कालावधीत भामटे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ सतत व्हिडिओ कॉल करून पाळत ठेवत होते. या काळात त्यांनी अंमलबजावणी ईडीच्या लेटरहेडवर अधिकृत दिसणारे बनावट समन्स व पत्र पाठवून त्यांचा मानसिक ताबा मिळवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT