Sambhajinagar Crime News
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पोलिसांचा धाक नसल्याने शहरात गावगुंड, कुख्यात गुन्हेगारांकडून खुलेआम हप्ता वसुलीसाठी दुकानदारांवर हल्ले केले जात असल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. तुम्ही इथे कॅफे कसे चालविता, आम्हाला पैसे द्या, असे म्हणत गुरुवारी (दि.३१) तिघांनी सिडको एन-५ भागात कॅफे चालकावर चाकूहल्ला करत त्याच्या भावाच्या डोक्यात रॉडने मारून जखमी केले. तर बुधवारी (दि.३०) किराडपुरा राममंदिरजवळ मोबाईल शॉपी चालकाला पैशाची मागणी करत कुख्यात गुन्हेगाराने मारहाण करून तोडफोड केली.
पहिल्या घटनेत फिर्यादी प्रतीक राजू राऊत (१९, रा. जालना, ह. मु. आविष्कार कॉलनी, एन-६) याच्या तक्रारीनुसार, तो आणि त्याचा मोठा भाऊ रोहित दोघे भाड्याने खोली करून राहतात. गेल्या सहा महिन्यापासून गुलमोहर कॉलनी भागात स्काय ब्ल्यू नावाचा कॅफे सुरु केला असून दोघे इव्हेन्टची देखील कामे करतात.
त्याचे ऑफिस कॅफेच्या तळमजल्यावरच आहे. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कॅफेमध्ये तीन अनोळखी गावगुंड तरुण आले. त्यांनी तुम्ही इथे कॅफे कसे चालविता? आम्हाला पैसे द्या असे म्हणत दमदाटी सुरु केली. रोहितने कशाचे पैसे द्यायचे असे म्हणताच तिघांनी राऊत बंधूंना मारहाण सुरू केली. एकाने चाकू काढून प्रतीकच्या गालावर वार करून त्याला जखमी केले. दोघे घाबरून कॅफेच्या बाहेर पाळतात. तिन्ही आरोपींनी पाठलाग करत रोहितच्या डोक्यात रॉडने मारहाण गंभीर जखमी केले. तिथे राऊतचा मित्र लहू तांबे सोडविण्यासाठी धावला तेव्हा त्याच्याही डोक्यात रॉड मारून जखमी केले. तिघांना जखमी अवस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. त्यानंतर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारेगावमधील कुख्यात गुन्हेगार शेख जमीर ऊर्फ कैची विरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. खून, जीवघेणा हल्ला करणे, लुटमार, दहशत निर्माण करणे आदी प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याला तत्कालीन पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी एमपीडीएची कारवाई करत नोव्हेंबर २०२३ मध्ये हर्सल जेलमध्ये स्थाबद्ध केले होते. मात्र, तो जेलमधून बाहेर पडताच पुन्हा गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे.
फिर्यादी जमील खान अफसर खान (४३, रा. आझाद चौक) यांची किराडपुरा राम मंदिरजवळ मोबाईल शॉपी आहे. बुधवारी (दि.३०) कुख्यात गुन्हेगार जमीर कैची साथीदारासह दुकानात आला. मला पैसे का देत नाही, असे म्हणून जमीरने हातातील लोखंडी सळईने काउंटरची काच फोडली. शिवीगाळ करून तुने अगर मुझे पैसे नही दिये तो मैं तुम्हे जान से मार डालूंगा, अशी धमकी दिली. खान त्याला समजावून सांगत असताना जमीरने सळईने त्यांच्या दंडावर मारून रक्तबंबाळ केले. चालकाला पैशाची मागणी करत सळईने मारहाण केली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास जमादार महादेव शिरसाठ करत आहेत.