छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar crime | चुलत भावाची हत्या करून मृतदेह जंगलात फेकला, तब्बल १५ दिवसानंतर घटना उघड

आरोपीनेच दिली भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार ; मृताच्या मोबाईलवरून केले घरच्याना मेसेज; पोलिसांचीही दिशाभूल, प्रा.लोंढे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथे एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मागील १५ दिवसांपासून बेपत्ता असलेला २५ वर्षीय तरुण राजू रामू बनसोड याचा त्याच्याच सख्ख्या चुलत भावाने निर्घृण खून केल्याचे उघड झाले आहे.

हत्येनंतर मृतदेह जंगलात फेकून देत २३ मे रोजी आरोपीने स्वतःच पोलिसांत धाव घेत भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासात आरोपीचे बिंग फुटले. रोहित बनसोड असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी रविवारी (दि.७) दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान उस्मानपुरा भागातील प्रा. लोंढे यांच्या हत्या प्रकरणी आरोपींनी ४० दिवस पोलिसांना खेळविले होते. त्याचप्रमाणे सिडकोतील ही घटना असल्याचे दिसून येत आहे.

तक्रारदारच निघाला खुनातील आरोपी

राजू बेपत्ता असल्याची तक्रार आरोपी रोहितने २३ मे रोजी सिडको पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिस आणि कुटुंबीय त्याचा शोध घेत असतानाच, रविवारी पाथ्री शिवारातील सामाजिक वनीकरणाच्या घनदाट जंगलात एका तरुणाचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ओळख पटवली असता, तो मृतदेह राजूचाच असल्याचे निष्पन्न झाले. गावाकडील जुने वाद आणि राजूची होत असलेली प्रगती पाहवली न गेल्याने निर्माण झालेल्या ईर्षेतून चुलत भाऊ रोहित बनसोड याने चाकूने भोसकून त्याची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.

लोकेशनने उघड केले बिंग

या घटनेत आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. खुनानंतर रोहितने राजूचा मृतदेह जंगलात फेकून दिला, मात्र त्याचा मोबाईल स्वतःकडेच ठेवला. कुणाला संशय येऊ नये म्हणून तो राजूच्या मोबाईलवरून घरच्यांना 'मी बाहेरगावी आहे' असे मेसेज पाठवून तो जिवंत असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करत होता. विशेष म्हणजे, २३ मे रोजी रोहितनेच राजूला हडको (एन-११) परिसरात सोडल्याचे सांगत सिडको ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासात राजू आणि रोहित या दोघांच्याही मोबाईलचे लोकेशन एकच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी रोहितला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

जागेवरच शवविच्छेदन

मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच शवविच्छेदन करून रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास राजूवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले आणि सहायक आयुक्त मनोज पगारे यांनी रविवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपी रोहितला सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. राजूच्या पश्चात आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT