Sambhajinagar Complaint against Minister Sanjay Shirsat by District Chief Janjal
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शिंदेच्या शिवसेनेतील स्थानिक पातळीवरील गृहकलह चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त करत त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. शिरसाटांच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यात पक्ष कोसळत आहे. त्यामुळे पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण सर्व परिस्थिती मांडणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे नाराज असून, ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. त्यात आता जंजाळ यांनी शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सगळ्यांना पर्याय असतात, मलाही आहेत, असा इशाराही दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून वेगळी चूल मांडली तेव्हापासून जंजाळ हे त्यांच्या पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
मात्र आता जिल्हाप्रमुख असूनही शिरसाट हे आपल्याला पक्ष कार्यात विचारात घेत नसल्याची तक्रार जंजाळ यांनी केली आहे. प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना जंजाळ यांनी शिरसाट यांच्यावर विविध प्रकारचे आरोप केले आहेत. मी जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी केली. लोकसभा आणि विधानसभेला पक्षाला जिल्ह्यात घवघवीत यश मिळाले.
परंतु आता माझ्या परस्पर नगरसेवकांच्या बैठका घेतल्या जात आहेत. ज्यांनी लोकसभा आणि विधानसभेला पक्षाच्या विरोधात काम केले, त्यांना जवळ करून निवडणुकीचे नियोजन केले जात आहे. काही दिवसांपूर्वी नगरपरिषद निवडणुकीसाठी शहरातील पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्या पालकमंत्र्यांच्या लेटरपॅडवर जाहीर करण्यात आल्या. त्यावेळीही मला विचारण्यात आले नाही, अशी नाराजी जंजाळ यांनी व्यक्त केली.
जायचे तर जा, थांबवले कुणी ? : शिरसाट
जंजाळ तक्रारी का करताहेत याची कारणे माहिती आहेत. आता त्यांना बोलू द्या. या विषयाचा सोक्षमोक्ष आता एकनाथ शिंदे हेच करतील. जंजाळ यांना जिल्हाप्रमुख करण्यात माझेही योगदान होते. परंतु सर्व माझ्याच ताब्यात द्या, असे म्हटल्याने होत नसते. पक्ष सगळ्यांना सोबत घेऊन चालवावा लागतो. त्यांना घोडेले चालत नाहीत, विकास जैन चालत नाहीत, तनवाणी चालत नाहीत, पटर्वधन चालत नाहीत, अशाने कसे चालेल. माझ्यावर आरोप करताहेत, थोडी लाज वाटली पाहिजे. मीही उत्तर देईल. तुम्हाला कुठे जायचे असेल तर जा. तुम्हाला थांबवले कोणी, अशा शब्दांत मंत्री संजय शिरसाट यांनी राजेंद्र जंजाळ यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
शिरसाट कार्यकर्त्यांना धमकावतात : जंजाळ
पालकमंत्री शिरसाट मला बैठकांना बोलवत नाहीत. तसेच मी बोलावलेल्या बैठकांना जायचे नाही, असे कार्यकर्त्यांना सांगतात. कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. मी त्यांच्याकडे विचारणा केली तर काही नाही, असे म्हणतात. पण पुन्हा करायचे ते करतात, असे जंजाळ यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले.
नाराजी दूर होईल : नीलम गो-हे
नीलम गो-हे म्हणाल्या, २४ तासांत नाराजी दूर होईल. शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे या बुधवारी शहरात आल्या होत्या. पत्रकारांनी त्यांच्याकडे जंजाळांच्या नाराजीविषयी विचारणा केली, त्यावर त्या म्हणाल्या, पालकमंत्र्यांनी विश्वासात घेऊन काम करावे ही त्यांची भूमिका योग्य आहे. मात्र जंजाळ यांची नाराजी २४ तासांत दूर होईल, असा दावाही त्यांनी केला.