

Protest against sugar factory for not declaring sugarcane prices
पैठण, पुढारी वृत्तसेवा पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या उसाला इतर कारखान्याप्रमाणे ऊस दर जाहीर न करणाऱ्या व थकीत बिल न देणाऱ्या साखर कारखान्याविरुद्ध बुधवारी (दि.२६) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुळमेश्वर गूळ कारखान्यावर आंदोलन सुरू केले आहे. ऊसउत्पादकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे पुकार-लेले आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी दुपारी गुळमेश्वर गूळ कारखाना नवगाव (ता. पैठण) हा कारखाना बंद करून या ठिकाणी आंदोलन सुरू केले. रात्रीच्या वेळीही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेले आहे.
पैठण तालुक्यातील संत एकनाथ साखर कारखाना, शरद - रेणुकादेवी या साखर कारखान्यांसह गूळ पावडर तयार करणाऱ्या गुळमेश्वर गूळ पावडर निर्मिती कारखाना व शिवाजी गूळ कारखान्यांनी योग्य ऊस दर जाहीर करण्याची मागणी करूनही ऊस दर जाहीर केला नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. गुळमेश्वर गूळ पावडर निर्मिती करणाऱ्या कारखान्याने पंचवीस रुपये भाव जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रकार केला, असा आरोप करण्यात आला.
कारखान्याकडे शेतकऱ्यांची थकीत दोनशे रुपये वाढीव राहिलेली रक्कम आतापर्यंत जमा करण्यात आली नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. याच्या निषेधार्थ बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष ज्ञानदेव मुळे, संतोष तांबे, अनिल औटे, कल्याण औटे, दिलीप नरके, संदीप भालेकर, एकनाथ दसपुते, ऋषिकेश औटे, गणेश गिर्गे, ज्ञानेश्वर पवार, महेश लांडगे, अण्णा ठाणगे, मुसाभाई शेख, अमोल औटे, बाबूराव बेळगे, सद्दाम सय्यद, सीताराम सुबागडे, प्रमोद वाघ, संतोष गोलटे यात सहभागी झाले आहेत.
पैठण तालुक्यातील साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभकरण्यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतर कारखान्याप्रमाणे ऊस दर जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून निवेद-नद्वारे करण्यात आली होती. तालुक्यातील साखर कारखाने व ऊस गूळ पावडर कारखान्यांनी संगणमत केले असून, यामधील फक्त गुळमेश्वर गूळ पावडर कारखान्याने २५०० रुपये भाव जाहीर करून शेतकऱ्यांचे बोळवण करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
इतर कारखान्यांनी आतापर्यंत ऊस दर जाहीर केलेला नाही. साखर कारखान्यांनी ऊस दर ३३०० रुपये प्रतिटन जाहीर करावा तर गूळ कारखान्याने साखर कारखान्यापेक्षा दोनशे रुपये दर कमी जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव मुळे यांनी सांगितले.
आज शेतकऱ्यांशी चर्चा
गुळमेश्वर गूळ पावडर कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना प्रतिटन पंचवीसशे रुपये ऊस दर जाहीर केलेला आहे. आंदोलन पुकारलेल्या शेतकऱ्यांची गुरुवारी (दि. २७) भेट घेण्यात येणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती गुळमेश्वर गूळ कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय खरात यांनी सांगितली आहे.