गुलमंडीत तब्बल २५ वर्षांनंतर धावणार सिटी बस Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar city bus service : गुलमंडीत तब्बल २५ वर्षांनंतर धावणार सिटी बस

१ मे रोजी या सेवेचे उद्घाटन करण्यात येणार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी भागात तब्बल २५ वर्षांपासून सिटी बस सेवा बंद आहे. मात्र ही सेवा आता पुन्हा शहरवासीयांसाठी सुरू करण्याचा निर्णय स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी घेतला आहे. त्यानुसार येत्या १ मे रोजी या सेवेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटीच्या मदतीने महापालिकेने शहरावासीयांसाठी स्मार्टसिटी बस सेवा सुरू केली आहे. यासाठी १०० बसेस स्मार्टसिटीच्या निधीतून खरेदी करण्यात आल्या आहेत. तर आणखी ३५ बस इलेक्ट्रिक बस लवकरच स्मार्टसिटीच्या ताफ्यात सामिल होणार आहे. मागील सात वर्षांपासून ही सेवा विनाखंड सुरू असून, सध्या शहराच्या विविध ४१ मार्गांवर बस धावत आहेत. स्मार्टसिटीकडे विविध वसाहतींतून बस सेवेची मागणी होत आहे. परंतु बसची संख्या कमी असल्याने सर्वच भागांसाठी सेवा देणे स्मार्टसिटीला शक्य होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शहराच्या मुख्य बाजारपेठेत मोडणाऱ्या गुलमंडी भागासाठी बस सेवा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यासंदर्भात बुधवारी स्मार्टसिटी बस विभागाचे प्रमोद देशमुख यांनी सभापती मकरिये यांची भेट घेतली. या बैठकीत स्मार्ट सिटी बसच्या मार्गाबाबत चर्चा करून गुलमंडीमार्गे बस कशी धावणार हे निश्चित करण्यात आले. १ मे रोजी या बससेवेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. रेल्वेस्टेशन, क्रांती चौक, पैठणगेटमार्गे बस गुलमंडीत येईल, असे सभापती मकरिये यांनी सांगितले.

असा असेल नवा मार्ग

रेल्वेस्टेशन, क्रांती चौक, नूतनकॉलनी, पैठणगेट, गुलमंडी, महात्मा फुले चौक, संभाजीपेठ, नागेश्वरवाडी, मिलकॉर्नर, मिलिंद महाविद्यालय, विद्यापीठ अशी धावणार स्मार्ट बस.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT