Cidco Waluj Mahanagar Water Crisis
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि.१७) संतप्त नागरिकांनी सिडको कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि सुमारे अर्धा तास ठिय्या आंदोलन केले. तसेच येत्या चार ते पाच दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास सिडको कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही नागरिकांनी दिला.
सिडको प्रशासनाकडून परिसरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये आठ-आठ दिवस नळांना पाणी येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. मंगळवारी सिडको भाग क्रमांक १ मध्ये तब्बल आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा झाला. मात्र अत्यंत कमी दाबाने आणि केवळ १५ मिनिटांसाठीच पाणी आल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भर उन्हात सिडको कार्यालय गाठत आंदोलन छेडले. यावेळी सिडको प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच एमआयडीसीकडून मिळणारे ५ एमएलडी पाणी नेमके कुठे जाते, असा सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
दरम्यान, सिडको प्रशासकांनी मोबाईलद्वारे आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. तसेच सिडको वाळूज महानगर भाग क्रमांक १ मध्ये रात्रीऐवजी दिवसा पाणी सोडण्यात यावे, या मागणीचे निवेदन नागरिकांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता कपील राजपूत व मारुती वावरे यांच्याकडे सादर केले.
या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख विष्णू जाधव, मसिआचे माजी अध्यक्ष अर्जुन गायकवाड, स्वप्नील आडसूळे, मारुती गायकवाड, नितीन जाधव, उर्मिला देशपांडे, लता पोतले, जयश्री खैरनार, राधिका पाटील, शारदा मोरे, सुवर्णा जामदार, योगिता निजवे, मनीषा माने, मंगल गाडेकर, अर्चना आडसूळे, अश्विनी सिरसाट, नलिनी नेहे, वनिता घोरपडे, सविता पवार, नीता सोनवणे, अर्चना गायकवाड, अश्विनी शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.