Child marriage pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar child marriage : अक्षदा पडण्यापूर्वीच दोन बालविवाह रोखले !

वऱ्हाडींची पळापळ, नवरदेवाने ठोकली धूम

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आम्ही मजुरी करतो, वयात आलेल्या मुलीचा खर्च आणि सांभाळ करण्याची आमची परिस्थिती नाही, असा टाहो फोडत गरिबीचे कारण पुढे करून अल्पवयीन मुलींचे लग्न उरकण्याचे दोन मोठे डाव पोलिसांनी उधळून लावले आहेत. हर्मूल-पिसादेवी रोड आणि सातारा गाव परिसरात मंडप सजलेला असताना आणि वऱ्हाडींची गर्दी जमलेली असताना ऐनवेळी पोलिसांनी एन्ट्री करत हे दोन्ही बालविवाह रोखले. कायद्यापुढे भावनांना थारा नसतो, हे दाखवून देत पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींची बालविवाहाच्या बेडीतून सुटका केली आहे.

(घटना १ : पिसादेवी रोड) ५०० वहऱ्हाडींसमोरच रोखले लग्न

हसूल-पिसादेवी रोडवरील आईसाहेब चौक परिसरात मंगळवारी (दि. २८) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका १५ वर्षीय मुलीचा विवाह लावला जात असल्याची गुप्त माहिती दामिनी हेल्पलाइनला मिळाली.माहिती मिळताच उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कल्पना खरात, साक्षी चंद्रे, पवार आणि चालक अलीम शेख यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

तिथे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि २८ वर्षीय नवरदेव बोहल्यावर चढण्याच्या तयारीत होते. सुमारे ४०० ते ५०० वऱ्हाडी उपस्थित होते. महिला बाल कल्याण विभागाचे सचिन दौंड यांनी मुलीचा जन्मदाखला आणि आधार कार्ड तपासले असता, ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा विवाह थांबवला आणि मुलीच्या पालकांना महिला बाल विकास समितीसमोर हजर राहण्याची समज दिली.

मेकअप सुरू असतानाच पोलिस धडकले दुसरी घटना सातारा गावात २८ एप्रिललाच उघडकीस आली. इथे एका १६ वर्षे ९ महिने वयाच्या मुलीच्या लग्नाचा घाट घालण्यात आला होता. मंडप सजला होता, नातेवाईक जमले होते आणि नवरीच्या मेकअपची लगबग सुरू होती. कांचनवाडीतून नवरदेव येण्याचीच तेवढी प्रतीक्षा होती. मात्र, तत्पूर्वीच सातारा पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक निर्मला राख, रामकृष्ण काळे, अंमलदार शिवाजी चव्हाण, पुरुषोत्तम दायमा आणि चाईल्ड हेल्पलाइनच्या आम्रपाली बोर्डे यांचे पथक मंडपात धडकले.

पोलिसांनी मुलीच्या वयाचा पुरावा मागितला असता, पालकांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. मात्र जन्मदाखला तपासल्यावर तिचे वय १८ पेक्षा कमी असल्याचे समोर आले. पोलिसांनी बालविवाहाच्या कायद्याची जाणीव करून देत हे लग्न रोखले. विशेष म्हणजे, मंडपात पोलिस आल्याची कुणकुण लागताच कांचनवाडीचा नवरदेव लग्नस्थळी न येता धूम ठोकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT