छत्रपती संभाजीनगर ते बहऱ्हापूरला जोडणाऱ्या चौपदरी रस्त्याचे काम अर्धवट असल्याने गैरसोय होत आहे. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Burhanpur road issue : संभाजीनगर, बऱ्हाणपूर रस्त्याचे आठ वर्षांपासून भिजत घोंगडे

निकृष्ट कामामुळे प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा; प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सिल्लोड : छत्रपती संभाजीनगर ते बऱ्हाणपूर या दोन राज्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाचे तब्बल आठ वर्षापासून भिजत घोंगडे आहे. सतत बदललेले निर्णय, तांत्रिक निकषांचा अभाव आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी सोयीऐवजी जीवघेणा ठरत आहे. नियोजनशून्य अंमलबजावणीमुळे हा महामार्ग आज एक ना धड भाराभर चिंध्या अशा अवस्थेत पोहोचला आहे.

या महामार्गाला २०१० मध्ये सहापदरी रस्त्याची मंजुरी मिळाली होती. २०१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. मात्र २०१४ मध्ये सहापदरी रद्द करून दुपदरीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पुन्हा चौपदरीचा निर्णय झाल्याने रस्त्याचे स्वरूप वारंवार बदलत गेले.

अखेर २०१७ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तिसऱ्यांदा कामाचा शुभारंभ झाला; तरीही आजपर्यंत रस्ता पूर्ण होऊ शकलेला नाही. सध्या या मार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे, उखडलेला रस्ता, भेगा आणि पुलाजवळील उंचड्डसखल भाग दिसून येतात. रस्ता समतल नसल्याने वाहनांना उड्या मारत जावे लागत असून टायर फुटणे, वाहनांचे नुकसान आणि अपघातांचा धोका वाढला आहे.

काम अपूर्ण असतानाही पूर्ण वाहतूक सुरू असल्याने प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा दरम्यान आवश्यक ठिकाणी नियोजित क्रॉसिंग देण्याऐवजी पेट्रोल पंप, खासगी दुकाने आणि अनावश्यक ठिकाणी दुभाजक तोडून क्रॉसिंग देण्यात आल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. सिल्लोड शहर हद्दीत तर मनमानी पद्धतीने दुभाजक तोडून प्रवेश मार्ग तयार करण्यात आले आहेत.

दुभाजकांचे काम निकृष्ट असल्याने ते सहज तोडता येत असल्याचेही चित्र आहे. एकूणच हा चौपदरी महामार्ग दर्जाहीन व धोकादायक बनला असून, भविष्यात अपघातांचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. संबंधित यंत्रणांनी टेंडरच्या अटी व अभियांत्रिकी निकष पाळून तातडीने दर्जेदार काम करावे, अशी तीव्र अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पूर्णा नदीवरील पुलाचे काम संथगतीने

भवन (माणिकनगर) येथील पूर्णा नदीवरील पुलाचे काम संथगतीने सुरू असून दोन्ही बाजूंना रस्ता अत्यंत खडतर आहे. फरशी वढोद, डोंगरगाव फाटा, बाळापूर, अजिंठा आदी ठिकाणीही वाहतुकीला मोठ्या अडचणी येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT