Sambhajinagar Buddhist caves, Ganapati
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि बीबी का मकबर्यापासून जवळच असलेल्या पर्वतरांगात बौद्ध संस्कृतीचा प्रभाव असणार्या औरंगाबाद लेण्या आहेत. या लेण्यात श्रीगणेशाचे दर्शन घडते, हे विशेष.
दोन हजार वर्षापूर्वीच्या असणार्या या लेण्यांमुळे शहराची ऐतिहासिक ओळख अधिक घट्ट होताना दिसते. या लेण्यांचा पहिला वृत्तांत जेम्स बर्ड यांनी 1847 मध्ये लिहिला. त्यानंतर 1858 मध्ये जॉन विल्सन, एम.एन. देशपांडे, डग्लस बॅरेट आदींनी लेण्यांबाबत माहिती दिली. वडोदरा येथील इतिहास तज्ञ डॉ. रमेश गुप्ते यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयात आवर्जून प्राध्यापक म्हणून बोलाविले. डॉ. गुप्ते यांनी या लेण्यांचा सविस्तर अभ्यास केला. या लेण्यांची तुलना त्यांनी अजिंठा आणि वेरूळमधील काही सर्वोत्तम शिल्पांशी केली.
विद्यापीठाच्या इतिहास विभागातील प्रा. दुलारी कुरेशी यांनी औरंगाबाद लेण्यांवर डॉक्टरेट पदवी संपादन केली. कुरेशी यांनी प्रथमच औरंगाबादच्या दगडी कोरीव लेण्यांचे विस्तृत आणि तपशीलवार दस्तऐवजीकरण सादर केले आणि त्याचबरोबर त्यांचे समीक्षात्मक विश्लेषण केले. दुलारी कुरेशी यांनी संशोधनात डॉ. गुप्ते यांनी लेण्यांमध्ये गणेश विराजमान असल्याचा शोध लावला होता, असे नमूद केले आहे.
कुरेशी यांनी त्यात म्हटले की, ही गुहा 1959 मध्ये इतिहासकार डॉ. रमेश गुप्ते यांनी शोधली होती. गुहेचा आकार खूपच नगण्य आहे. ती फक्त 10.11 फूट रुंदी, 13 फूट खोली आणि 6.10 फूट उंचीची आहे. गुहेच्या छताला दोन खांब आधार देतात. गुहेच्या डाव्या भिंतीवर, सप्तमातृकाचा एक फलक कोरलेला आहे, ज्यामध्ये डाव्या बाजूला वीरभद्र आणि एका ओळीत सहा मातृका आहेत. डाव्या बाजूला पुरेशी जागा नसल्याने, सातवी मातृका, चामुंडा, समोर कोरलेली आहे. मध्यभागी भगवान गणेश आहेत; त्यांच्या उजवीकडे दुर्गेची आकृती कोरलेली आहे. गुहेच्या उजव्या भिंतीवर बुद्धाची एक प्रतिमा कोरलेली आहे. या गुहेत ब्राह्मण आणि बौद्ध - या दोन धर्मांचे एकत्रीकरण दिसून येते. त्याची कारागिरी निकृष्ट दर्जाची आहे, परंतु बौद्ध संकुलातील ही एकमेव ब्राह्मण गुहा असल्याने ती एक महत्त्वाची गुहा आहे.
इतिहासाचे अभ्यासक संकेत कुलकर्णी यांनी औरंगाबाद लेण्यांच्या संवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया दिली. सहाव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये गणपती आणि बुद्ध यांच्या मूर्ती एका जागी आहेत. अगदी सुरुवातीच्या काळातील ही संमिश्र लेणी अपूर्ण असली, तरी दुर्मिळ आहे. या लेणीत गणपतीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूंनी दुर्गा आणि काली यांच्याही मूर्ती आहेत. मूर्तींची बरीच झीज झालेली आहे, त्यामुळे काही शिल्पे पूर्णतः झिजलेल्या अवस्थेत आहेत, असे त्यांनी सांगितले.