

Paithan Dabharul ganja raid
पैठण : पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाभरूळ शिवारात गुन्हा शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई करत ६७ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत एकूण २३ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, दाभरूळ शिवारातील गट क्रमांक १२६ मधील पत्र्याच्या शेडवर काही जण गांजाचा साठा करून विक्री करत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. विनायकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय अधिकारी सुनील पाटील व गुन्हे शाखा निरीक्षक विजय राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईत रामसिंग कारभारी जारवाल, रमेश विजयसिंग नरेडा आणि रामेश्वर त्रिंबक बमनात (सर्व रा. निहालसिंगवाडी, ता. अंबड, जालना) तसेच ग्राहक मित श्याम वैष्णव (रा. जोडवाडी, छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, केसरसिंग धनसिंग जारवाल, निलेश उर्फ बंटी बाबूलाल सुलाने आणि आनंद प्रताप जारवाल (रा. जोडवाडी, छत्रपती संभाजीनगर) हे तिघेजण अंधाराचा फायदा घेत फरार होण्यात यशस्वी झाले.
या धाडीत पोलिसांनी ६७ किलो ५०० ग्रॅम गांजा, तीन मोटरसायकल, पाच मोबाईल फोन असा एकूण २३ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पाचोड पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून फरार आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, पोलीस उपनिरीक्षक बळीराम काकडे, श्रीमंत भालेराव, प्रमोद पाटील, सचिन राठोड, अंगद तिडके, दीपक सुरासे, बलवीरसिंग बहुरे यांनी ही कारवाई केली.