Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar birth death certificate : झोन कार्यालयात रखडले जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचे अर्ज

आयुक्तांच्या पाहणीत भोंगळ कारभार उघड : दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासाठी नागरिकांचे हेलपाटे सुरू असतानाच महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मंगळवार (दि.११) च्या अचानक पाहणीत झोन कार्यालयांतील धक्कादायक प्रकार समोर आला. झोन क्रमांक ३ व ७ मध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचे अनेक अर्ज महिनोन्‌महिने रखडले असल्याचे आढळले.

अर्ज निकाली काढण्याऐवजी ते साचवून का ठेवले, असा जाब आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांना विचारत चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

महापालिकेच्या झोन कार्यालयांतील जन्म मृत्यू प्रमाणपत्र विभागाच्या संथ कारभाराबाबत महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. त्यावरून त्यांनी मंगळवारी झोन क्रमांक ३ व ७ या दोन्ही कार्यालयांना भेट देऊन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागाच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी दोन्ही कार्यालयात अनेक अर्ज महिनोन्‌महिने प्रलंबित असल्याचे आढळून आले.

या प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त येडगे यांनी प्राप्त अर्जाचा तातडीने निपटारा करण्याचे आदेश दिले. तसेच प्रमाणपत्रासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत, प्रक्रिया सुलभ करावी आणि प्रत्येक अर्जावर वेळेत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. दरम्यान, झोन क्रमांक ३ मधील एका महिला कर्मचाऱ्याच्या कामकाजाचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे.

संबंधित विभागाकडून सायंकाळी या कार्यालयातील प्रलंबित अर्जाचा स्वतंत्र आढावा घेऊन अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार होता, त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करायची की नाही, याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान अर्ज प्रलंबित राहण्यामागे संकेतस्थळ वारंवार बंद पडणे, तांत्रिक अडचणी तसेच झोन कार्यालयांतील मर्यादित संगणकीय सुविधा ही कारणे असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, तांत्रिक अडचणी असल्या तरी नागरिकांना वेळेत सेवा देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे आयुक्तांनी बजावले. आयुक्तांच्या या पाहणीनंतर प्रलंबित अर्जाचा निपटारा आणि दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

एका कर्मचाऱ्यावर कारवाईची शक्यता

झोन क्रमांक ३ मधील जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागात मोठ्या प्रमाणावर अर्ज प्रलंबित असल्याचे आढळले. याप्रकरणी संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या कामकाजाचा स्वतंत्र आढावा घेण्यात येणार आहे. हा अहवाल विभागप्रमुखांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करायची की अन्य शिस्तभंगाची कारवाई, याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

एकच आयडीचा अडथळा

झोन कार्यालयांमध्ये जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या कामासाठी एकच संगणकीय प्रवेश-ओळख (आयडी) उपलब्ध असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच प्रमाणपत्राची संकेतस्थळावरील प्रक्रिया वारंवार खंडित होत असल्याने अर्जाचा निपटारा रखडतो. तांत्रिक अडथळ्यांमुळे नागरिकांना वेळेत प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT