Biker killed in car collision
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२७) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जालना रोडवरील सेवनहिल उड्डाणपुलाजवळ घडली. पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी ही माहिती दिली. अपघातात मृत झालेल्या तरुणाची माहिती नसल्याने रात्री उशिरापर्यंत पुंडलिकनगर पोलिसांकडून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार (एमएच २० एफ वाय ३९६३) रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवर भरधाव सिडकोकडून सेवनहिलकडे जात होता. त्याचवेळी पाठीमागून सेवनहिल उड्डाणपुलाच्या अलीकडे कार चालकाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. या अपघातामुळे रस्त्यावर सुमारे एक तास मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. सेवनहिलपासून हायकोर्ट सिग्नलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक भंडारे यांनी ड्यूटी अधिकारी उपनिरीक्षक सुनील मस्के यांच्यासह पोलिसांना घटनास्थळी रवाना केले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तोपर्यंत स्थानिकांनी मृताला घाटीत हलविले. रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटली नाही. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.