Chhatrapati Sambhaji Nagar Latest News
छत्रपती संभाजीनगर : अदालत रोडवरील कासलीवाल मैदान समोरच्या फूटपाथवरून मित्रासोबत निघालेल्या गौरव मावस (२३, रा. मांगेगाव, ता. गंगापूर) या तरुणाला सोमवारी (दि. २४) दुपारी अडीच्या सुमारास चाकूने भोसकून पसार झालेल्या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्या दोघांना भावसिंगपुऱ्यातील अण्णाने चाकूहल्ला करण्यासाठी दीड हजार रुपये दिल्याचे तपासात समोर आले. मात्र नेमकी सुपारी किती रकमेची आणि हल्ला करण्यामागे हेतू काय हे अद्याप समोर आलेले नाही.
वीरेंद्र ऊर्फ गणेश राजेंद्र शिरसाठ (२३, रा. साठे चौक, भावसिंगपुरा) आणि हनी ऊर्फ हर्षद भूषण जावळे (१९, रा. ख्रिस्तनगर, शांतीपुरा, छावणी) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, गौरव मावस हा त्याचा मित्र विजय साळुंके सोबत बाबा चौकातून न्यायालयाच्या दिशेने फुटपाथवरून पायी जात होता. कासलीवाल मैदानासमोर फूटपाथवर समोरून दोघे पायी आले. त्यातील एकाने गौरवच्या पोटात आणि छातीत चाकू खुपसून गंभीर जखमी केले. चाकू घेऊन दोघेही बाबा चौकाच्या दिशेने पळून गेले.
अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या विजयने त्याला गौरवचा न्यायालयात असलेला मामा अभिजित साळवे यांच्याकडे जखमी अवस्थेत नेले. परंतु मामा तिथे नसल्याने त्याला न्यायालयातील रुग्णालयात नेऊन तेथून पोलिसांच्या मदतीने घाटी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनेनंतर गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी पथकांना पाचारण केले. सहायक निरीक्षक विनायक शेळके, जमादार मनोज अकोले, प्रदीप दंडवते, अंमलदार मंगेश शिंदे यांच्या पथकाने वीरेंद्र आणि हर्षद दोघांना मध्यरात्री बेड्या ठोकल्या. दोघांना क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन केले.
चार वर्षांपूर्वी पोलिसांवर हल्ला
भावसिंगपुऱ्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात अण्णाने २०२१ पोलिसांवर हल्ला केला होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र मध्यंतरी तो पोलिसांच्या नजरेपासून दूर होता. मात्र अचानक त्याचे नाव गुन्ह्यात निष्पन्न झाले आहे.
हनी रिक्षाचालक, तर वीरेंद्र बँड पथकात
हनी जावळे हा निराधार आहे. तो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. त्याला नातेगोते कोणीही नसल्याने तो नशेच्या आहारी गेलेला आहे. तर वीरेंद्र मजुरी काम आणि बँड पथकात ढोल वाजवितो. त्याला पत्नी आणि आई आहे. दोघेही नशेखोर असल्याने चाकूहल्ला करण्यासाठी अण्णाने त्यांचा वापर केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुपारी देणारा चौथाही असण्याची शक्यता
भावसिंगपुरा भागातील कुख्यात अण्णाने हल्ल्याची सुपारी घेतली असावी. तो पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्याने त्याने या दोघांना हल्ल्यासाठी तयार केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. त्यामुळे अण्णाला सुपारी देणारा आणखी एक जण असू शकतो, असा अंदाज आहे.
हल्ल्यामागे प्रॉपर्टी वादाची किनार
सूत्रांच्या माहितीनुसार, हा हल्ला प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याची शक्यता आहे. भावसिंगपुरा भागातील अण्णाने आरोपी वीरेंद्र आणि हनी दोघांना फुल्ल दारू पाजून दीड हजार रुपये दिले. त्यानंतर काही रक्कम देण्याचे ठरले. पैसे हातात पडताच दोघांनी गौरवला चाकूने भोसकले.