

Attempt to shoot young man fails, resulting in fatal stabbing
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : पैशाच्या वादातून तरुणावर तिघांनी पिस्तुलातून गोळी झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळीबाराचा प्रयत्न फसल्याने त्याच्यावर चाकू, कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. झटापटीत आरोपींच्या पिस्तूलची मॅगझीन घटनास्थळी पडली. आरोपी स्कार्पिओमधून पसार झाले. ही थरारक घटना बुधवारी (दि. २४) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास महाराणा प्रताप चौकात घडली. भोलानाथ शामराव कडविंचे (३२, रा. मूळ सिल्लोड, ह. मु. वडगाव कोल्हाटी) असे या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, बजाजन गरातील महाराणा प्रताप चौकात एचपी गॅससमोर बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भोलानाथ कडमिंचे हा उभा होता. यावेळी स्कॉर्पिओ जीपमधून तीन आरोपी आले. त्यांनी काही कळण्याच्या आत भोलानाथवर पिस्तूल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने विरोध केल्याने गोळीबाराचा प्रयत्न फसला आणि मॅगेझीन खाली पडली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने गंभीर वार करून आरोपी स्कॉर्पिओ जीपमधू पसार झाले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे फौजफाटा घेऊन घटनास्थळी धावले. भोलानाथ याच्या पार्श्वभागावर तसेच त्याच्या पोटावर जखमा होऊन तो घटनास्थळी जखमी अवस्थेत पडलेला होता. पिस्तूलची मॅगेझीन आढळून आली. पोलिसांनी भोलानाथला उपचारासाठी घाटीत दाखल केले. दरम्यान, ही घटना भिशीच्या वादातून झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येते.
घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त पंकज अतुलकर, गुन्हे शाखेचे रत्नाकर नवले, सहाय्यक पोलिस आयुक्त संजय सानप, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याशिवाय फॉरेन्सिकच्या पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, भोलानाथ याचे एमआयडीसी वाळूज आणि टीव्हीसेंटर भागातील एकासोबत पैशाचा व्यवहार होता. त्या व्यवहारातून हा हल्ला झाला असावा, असा संशय आहे. गुन्हे शाखेसह एमआयडीसी वाळूज पोलिसांची पथके आरोपींचा शोध घेत आहेत.