छत्रपती संभाजीनगर : शहरात ड्रग्ज, नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या टोळ्यांवर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) धडक कारवाई सुरू केली आहे. शनिवारी २ हजार गोळ्या टाकून पळून गेलेला ड्रग्ज माफिया अंधा फिरोजचा भाऊ सय्यद अझरला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या. तर मंगळवारी (दि.२४) रात्री पुन्हा पथकाने घाटी रुग्णालयासमोर सापळा लावून त्याचा नातेवाईक तौफिक रशीद अली याला २ हजार ४०० गोळ्यांसह पकडले. या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये नशेच्या एकूण ४४०० गोळ्या आणि १३२ सायरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याची माहिती एएनटीएफचे उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी बुधवारी (दि. २४) दिली.
अधिक माहितीनुसार, शनिवारी (दि.२१) छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एएनटीएफच्या पथकाने सापळा रचला होता. ट्रॅव्हल्सने सुरत येथून माल घेऊन आलेला सय्यद अझर सय्यद अकबर (२६, रा. चांदमारी, छावणी) पोलिसांची चाहूल लागताच २ हजार गोळ्या, ११४ सिरप बाटल्याचा माल टाकून पळून गेला होता.
अखेर सोमवारी (दि.२३) छावणी परिसरातून त्याला अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच जेलमध्ये गेलेल्या अंधा फिरोज या ड्रग्ज माफियाने आपल्या भावाला (सय्यद अझर) या धंद्यात उतरवल्याची चर्चा आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजित टिके, उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक दीपाली पाटील व त्यांच्या पथकाने केली.
घाटी रुग्णालयासमोर सापळा
मंगळवारी (दि. २४) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास एएनटीएफच्या पथकाने घाटी रुग्णालयासमोर सापळा लावला. तौफिक रशीद अली (२४, रा. चांदमारी) नशेच्या गोळ्या विक्रीसाठी घेऊन येताच ताब्यात घेतला. त्याच्याकडे नशेच्या २ हजार ४०० गोळ्या आणि सिरपच्या १४ बाटल्या मिळून आल्या. तौफिक हा मुख्य आरोपी अझरचा नातेवाईक असून मूळचा उत्तरप्रदेशचा आहे. १२ वर्षांपासून शहरात राहतो. बायजीपुऱ्यातून तो चांदमारीत राहायला गेला होता. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदमारी : ड्रग्ज पेडलर्सचे नवे केंद्र
शहरात पोलिसांच्या सततच्या कारवायांमुळे अनेक जुन्या टोळ्या गजाआड झाल्या आहेत. मात्र, आता शहरापासून दूर असलेल्या पडेगाव-चांदमारी भागात नवीन टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. गुन्हे शाखेने यापूर्वीही पडेगावात कारवाई करून ड्रग्ज पेडलर्सची टोळी पकडली होती. आता पुन्हा याच भागातील दोन आरोपी नशेचा बाजार करताना मिळून आल्याने, चांदमारीत नशेचा गोरखधंदा तेजीत सुरू असल्याचे समोर आले आहे.
सुरत कनेक्शन आणि नशेचा बाजार
शहरात पार्सलने येणारा माल बंद झाल्याने हे पेडलर्स स्वतः गुजरातच्या सुरत किंवा अहमदाबाद येथे जाऊन नशेच्या गोळ्या आणि सिरप आणत असल्याचे उघड झाले आहे. निट्रोसॅन-१० नावाची गोळी तयार करणाऱ्या कंपनीने आता ऍडपॅम १० या नव्या नावाने गोळ्यांची निर्मिती सुरू केली आहे. सुरतमधील मेडिकल व्यावसायिक किंवा एजंट या पेडलर्सना माल पुरवत असल्याचा दाट संशय असून, एएनटीएफचे पथक त्या दिशेने तपास करत आहे.
दोन दिवसाआड २५ हजार गोळ्या
सूत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवसांआड २० ते २५ हजार गोळ्या आणि सिरपचा साठा शहरात येत आहे. चांदमारी, पडेगाव आणि शहरातील काही पेडलर्स मार्फत नशेखोरांना माल विक्री करून गोरखधंदा चालवीत आहेत. ६०० रुपयांना मिळणारी गोळ्यांची स्ट्रीप नशेखोरांना १२०० रुपयांना, तर १२० रुपयांची सिरप बाटली ६०० रुपयांना ब्लॅकमध्ये विकून मोठा काळाबाजार सुरू आहे.
अरिवल मालकची टोळी पुन्हा सक्रिय ?
सिल्क मिल भागातील कुख्यात ड्रग्ज माफिया अखिल मालक याला गुन्हे शाखेने तीन महिन्यापूर्वी बेड्या ठोकल्या होत्या. तत्पूर्वी त्याचा पार्टनर अंधा फिरोजला पडकले होते. अखिल गुजरातच्या आयशाकडून माल मागवून शहरात पेडलर्सला द्यायचा. मात्र, खोलवर तपास न झाल्याने त्याच साखळीद्वारे माल आणून पुन्हा नशेचा बाजार केला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.