Sambhajinagar Accused record tries bike journalist
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रेकॉर्डवरील आरोपीने गुंडगिरी करीत ज्येष्ठ पत्रकार शेषराव पठाडे यांच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी वाद घालत असल्याचे पाहून सोडवायला आलेल्या त्यांच्या पत्नीलाही आरोपीने शिवीगाळ केली. १९ नोव्हेंबरच्या रात्री ११.१५ वाजता गारखेडा परिसरातील तिरुपती विहार अपार्टमेंटसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कार्तिक राजू लोकल (रा. तिरुपती विहार, गारखेडा परिसर), असे आर-ोपीचे नाव आहे. ज्येष्ठ पत्रकार शेषराव पठाडे यांच्या पत्नीने फिर्याद दिली. त्यानुसार, ड्यूटी संपल्यावर बुधवारी रात्री पठाडे हे दुचाकीने घरी गेले. ते त्यांच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दुचाकी वळवत असताना मागून दुचाकीवर आलेला आरोपी कार्तिक लोकल याने थेट त्यांच्या अंगावर दुचाकी (एमएच २०- सीएन- ०४४७) घालण्याचा प्रयत्न केला.
पठाडे यांनी त्याला अंगावर गाडी घालताय का? असे विचारताच त्याने शिवीगाळ सुरू केली. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पठाडे यांनी त्यांच्या पत्नीला कळविताच त्या फ्लॅटमधून खाली आल्या. त्या वाद मिटवत असताना आरोपीने त्यांनाही अश्लील शिवीगाळ केली. अधिक तपास हवालदार संतोष केवारे करीत आहेत.
हा महिन्यांपूर्वी आरोपी कार्तिक लोकलने सिडको चौकाजवळील हॉटेल कलिंगामध्ये राडा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आशिष पवार यांना मारहाण करीत त्यांच्यावर पिस्तूल रोखले होते. पुढे पोलिसांनी हे पिस्तूल नकली असल्याचे स्पष्ट केले होते.
पांढरे कपडे घालून भाईगिरी
लोकलचे वडील पाटबंधारे खात्यात नोकरीला होते. त्यांच्या जागी तो नोकरीला लागणार असल्याचे सांगत असतो, मात्र सहा महिन्यांत त्याने दुसरा गुन्हा केला आहे. तो पांढरे कपडे घालून भाईगिरी करीत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.