हसीनन मोईनोद्दीन शेख pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar student death : इन्स्टाग्राम रील बनवण्याचा मोह जीवावर बेतला

वाल्मी तलावात बुडून १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : इन्स्टाग्रामवर रील बनवण्याचा मोह एका १६ वर्षीय विद्यार्थ्याच्या जीवावर बेतल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वाल्मी परिसरातील तलावात रीलसाठी व्हिडिओ शूट करताना पाण्याचा अंदाज न आल्याने खड्यात बुडून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हसीनन मोईनोद्दीन शेख (१६, रा. शहानगर, बीड बायपास) असे या मृत तरुणाचे नाव असून, तो इयत्ता १२ वीत शिक्षण घेत होता.

अधिक माहितीनुसार, हसीनन हा सकाळी दोन मित्रांसोबत वाल्मी परिसरातील तलावावर इन्स्टाग्रामसाठी रील तयार करण्यासाठी गेला होता. व्हिडिओ काढत असताना अधिक चांगल्या शूटिंगसाठी तो पाण्यात उतरला. मात्र या तलावात मोठे खड्डे असल्याचा त्याला अंदाज आला नाही. पाण्यात पुढे-पुढे जात असताना अचानक तो एका खोल खड्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला.

मित्र डोळ्यादेखत बुडत असल्याचे पाहून सोबत असलेल्या मित्रांनी घाबरून आरडाओरड केली व परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. नागरिकांनी या घटनेची माहिती तात्काळ सातारा पोलिसांना आणि अग्निशमन दलाला दिली.

पोलिस आणि अनिशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ बचावकार्य राबवून हसीननला बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढले. त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने हळहळ

हसीननचे वडील रेल्वे मालधक्क्यावर हमालीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तीन बहिणींच्या पाठीवर असलेला हसीनन हा आई-वडिलांचा एकुलता एक आणि लाडका होता. अत्यंत गरिबीतही वडिलांनी त्याला वर्षभरापूर्वीच एक नवी दुचाकी घेऊन दिली होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एकुलत्या एक मुलाच्या अशा अकाली जाण्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT