Sambhajinagar Crime Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Crime News: लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल, ट्रोलिंगला कंटाळून 27 वर्षांच्या तरुणानं आयुष्य संपवलं; संभाजीनगरची घटना

Chhatrapati Sambhajinagar: महेशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला असून त्याचे दोन्ही हात बांधलेले होते.

Anirudha Sankpal

Chhatrapati Sambhajinagar Latest News

छत्रपती संभाजी नगर : व्हायरल व्हिडिओमुळे सातत्याने होणाऱ्या ट्रोलिंगला कंटाळून 27 वर्षांच्या तरुणाने आयुष्य संपवल्याची घटना मराठवाड्यात घडली. महेश अधे असे या तरुणाचे नाव असून जालना जिल्ह्यातील ढोकमाळ तांडा येथील शेतातील विहिरीत उडी घेऊन त्याने आपले जीवन संपवले. महेशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला असून त्याचे दोन्ही हात बांधलेले होते.

महेश अधे आणि त्याच्या मित्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात हे दोघेजण छत्रपती संभाजीनगर लिहिलेल्या रेल्वे स्टेशन बोर्डखाली लघुशंका करताना दिसत होते. हा व्हिडिओ ३० ऑक्टोबर रोजी रेकॉर्ड करण्यात आला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अधे आणि त्याच्या मित्राला ऑनलाईन ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या दोघांनी पुढच्याच दिवशी माफी मागणारा एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता. मात्र त्यानंतरही या दोघांचे ऑनलाईन ट्रोलिंग सुरूच होते.

अष्टी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी गणेश सुरवसे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, व्हिडिओ क्लिपमुळं महेश हा अनेक दिवसांपासून अस्वस्थ होता. त्याचा हा लघुशंका करतानाचा व्हिडिओ आणि त्यानंतर माफीनामा देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यानं ट्रोलिंग करणं थांबवण्याची विनंती देखील केली होती.

'ट्रोलिंगमुळे होणारा त्रास आता असह्य झालाय'

महेशच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, 'महेशला सतत ट्रोल केलं जात होते. त्याला बुधावारी सकाळी सहा वाजता एक फोन कॉल आला होता. महेशनं त्याचा चुलत भाऊ आणि काकांना सांगितलं होतं की त्याला आता हा त्रास आता असह्य होतोय. त्यानंतर त्यानं साडे सहा वाजता घर सोडलं. त्यानंतर तो सकाळी साडे नऊ पर्यंत परतला नाही. कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना विहिरीजवळ त्याच्या पायाच्या खुणा आणि मोबाईल मिळाला. त्यानंतर विहिरीतून सकाळी ११ वाजता त्याचा मृतदेह हात बांधलेल्या अवस्थेत बाहेर काढण्यात आला.

आम्ही या प्रकरणी ज्यांनी ज्यांनी महेश आणि त्याच्या मित्राला धमकी दिली अन् ट्रोलिंग केलं त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. सकाळी सहा वाजता आलेल्या फोनबाबत देखील आम्ही चौकशी करत आहोत.
अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक, जालना

दरम्यान, या प्रकरणी महेशचा चुलत भाऊ अखिलेशने अष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवली आहे.

प्रथामिक तपासात असं आढळून आलं आहे की अधे आणि त्याचा मित्र हा नशेत होते. ते संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बोर्डखाली लघुशंका करत असतानाचा त्यांचा व्हिडिओ शूट करण्यात आला. ज्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला अन् त्यांचं ट्रोलिंग होऊ लागलं त्यावेळी त्यांनी पुढच्याच दिवशी माफी मागणारा व्हिडिओ पोस्ट केला. त्यांनी आपली चूक मान्य करत माफ करण्याची विनंती केली होती. मात्र त्यानंतरही काही सोशल मीडिया पेजेसवरून त्यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यांना धमक्या देखील येत होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT