Nandurbar Police Death Car Accident Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Car Accident | कन्नडजवळ कार मातीच्या ढिगाऱ्यात घुसली; नंदुरबारच्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

उड्डाणपुलाच्या कामाचा अंदाज न आल्याने कार दुभाजक तोडून मातीच्या ढिगाऱ्यात घुसली

पुढारी वृत्तसेवा

Nandurbar Police Death Car Accident

कन्नड : धुळे-सोलापूर महामार्गावर कन्नड शहराजवळ सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात नंदुरबार येथील पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. संभाजी विश्वनाथ कांबळे (वय ५२) असे मृताचे नाव असून, ते माजी सैनिक होते.

संभाजी कांबळे हे सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात लिपिक पदावर कार्यरत होते. सोमवारी ते नंदुरबारहून छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरी एमएच २० एचएच ३६८७ क्रमांकाच्या कारने जात होते.

दरम्यान, कन्नड शहराजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर उड्डाणपूल आणि सर्व्हिस रोडचे काम सुरू आहे. मध्यरात्रीच्या अंधारात रस्त्यावरील सुरू असलेल्या कामाचा अंदाज न आल्याने कांबळे यांचे कारवरील नियंत्रण सुटले. कारने महामार्गावरील दुभाजक तोडून सर्व्हिस रोडच्या दिशेने जात मातीच्या मोठ्या ढिगाऱ्यात धडक घेतली. या अपघातात कांबळे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा कारमध्येच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच कन्नड शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने कांबळे यांना कारमधून बाहेर काढून कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कांबळे यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT