Salesman commits obscene act in front of woman in cloth shop
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रक्षाबंधन सणानिमित्त भावासोबत साडी खरेदी करण्यास गेलेल्या महिलेकडे बघून दुकानातील सेल्समनने अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवारी (दि.३०) सायंकाळी पाचच्या सुमारास पैठणगेट परिसरातील एका कापड दुकानात घडली. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर दुकानाच्या परिसरात दोन गट आमने-सामने आले होते. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर दोन्ही गट क्रांती चौक पोलिस ठाण्यात गेले.
३२ वर्षीय सारिका (नाव बदललेले) या जळगाव जिल्ह्यात सासरी राहतात. त्या काही दिवसांपूर्वी माहेरी आल्या होत्या. अवघ्या आठ दिवसांवर रक्षाबंधन सण असल्याने आणि पुन्हा लगेच येणे शक्य नसल्याने भावाने त्यांना पसंतीची साडी घेण्याचा आग्रह करून पैठणगेट भागातील एका दुकानात नेले. त्यावेळी त्याची आईही सोबत होती. त्यांना दुकानातील दोन साड्या पसंत पडल्या. त्या खांद्यावर टाकून आरशासमोर बघत, आईला दाखवत होत्या.
त्यावेळी दुकानातील सेल्समन म्हणून काम करणारा अल्पवयीन सोहेल (नाव बदललेले आहे) हा समोरील बाजूला असलेल्या चेजिंग रूममध्ये पॅन्ट काढून अश्लील चाळे करत असल्याचे दिसले. त्याने चेजिंग रूमचे दार उघडेच ठेवले होते. त्याने तीन वेळा सारिका यांच्याकडे बघून हा प्रकार केला.
त्यामुळे सारिका यांनी हा प्रकार भावाला सांगितला. त्यांनी दुकान मालकाला आवाज देताच सोहेल मागच्या दाराने पसार झाला. दुकान मालकाने त्याचे नाव व पत्ता सांगितला. त्यानंतर गंभीर प्रकार असल्याने दुकानात चांगलाच गोंधळ उडाला. शिवसेनेचे आदित्य दहिवाल यांना माहिती मिळताच ते कार्यकर्त्यांसह धावले.
त्यानंतर दुसरा गटही दुकानाच्या समोर आला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर छेडछाडीचे प्रकरण असल्याने दोन्ही गट क्रांती चौक पोलिस ठाण्यात गेले. पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी महिलेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून घेतला. आरोपी मुलाच्या वयाची पडताळणी करण्यात आली असून, त्याचे वय १७ वर्षे असल्याचे निरीक्षक माने यांनी सांगितले.