Saksham App Differently Abled Municipal Corporation
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: दिव्यांग नागरिकांना महापालिकेच्या विविध सेवा व सुविधा घरबसल्या मिळाव्यात, यासाठी महापालिकेने सक्षम अॅप सुरू केले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात शनिवारी (दि. १५) या अॅपचे लोकार्पण करण्यात आले. हयात प्रमाणपत्रासह विविध शासकीय योजनांचा लाभघेण्यासाठी दिव्यांगांना आता वारंवार महापालिका कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही.
महापालिकेने दिव्यांग नागरिकांना हयात प्रमाणपत्रासह विविध शासकीय योजनांचा लाभघेण्यासाठी सक्षम अॅप सुरू केले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत शनिवारी या अपचे लोकार्पण करण्यात आले. या अॅपमुळे दिव्यांगांना विविध सेवा-सुविधांची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
याच कार्यक्रमात महापालिकेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी सिम्फनी बँडच्या माध्यमातून देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले.
तसेच मलखांब, लेझीम यांसह विविध कौशल्यांची प्रात्यक्षिकेही विद्यार्थ्यांनी सादर केली. त्यांच्या कलागुणांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. दिव्यांगांसाठी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सेवा सुलभकरण्याचा उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला सामाजिक समावेशकतेची जोड मिळाली.