Saint Janabai—of 'Vithu Majha Lekurvala' fame—was from Gangakhed!
छत्रपती संभाजीनगर : विठ्ठलावर अनेक भक्तीगीते आहेत, त्यामध्ये 'विठू माझा लेकुरवाळा' हा अभंग आशा भोसले यांनी सुमधूर आवाजात गायला आहे. हा अभंग लिहिणार्या संत जनाबाई या मराठवाड्यात गोदावरीच्या काठावर असणार्या गंगाखेडच्या (जि. परभणी).
जनाबाई या वारकरी ‘दमा’ आणि ‘करुंड’ या दांपत्याची कन्या होत. हे दांपत्य उपेक्षित समाजातील असले तरी त्यांची भगवद्भक्ती निर्विवाद. दरवर्षी वारीला जाणार्या या दांपत्याच्या पोटी संतान नसल्यामुळे त्यांनी विठ्ठलाला पुत्राचे साकडे घातले. तेव्हा विठ्ठलाने त्यांना दृष्टांत देत तुला मुलगी होईल आणि ती संत नामदेवाची भक्त होऊन आपले स्थान निर्माण करेल, असे सांगितले.
विठ्ठलाने दिलेल्या या वरानुसार त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. पाच सहा वर्ष सांभाळ केल्यानंतर त्यांनी पंढरपुरात रहात असलेल्या दामाशेट (संत नामदेवांचे वडिल) यांच्याकडे तिला सुपुर्द केले. दरम्यानच्या काळात जनाबाईच्या आईचेही निधन झाले, वडिल तीर्थयात्रेला निघून गेल्यामुळे जनाबाई नामदेवांकडे दासी म्हणून राहू लागली.
संत नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. नामदेवांचे कुटुंब चौदा जणांचे होते, त्यात मी आल्यामुळे पंधराचे झाले, असे त्यांनी एका अभंगात नमूद केले आहे. त्यामुळे त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी वारकरी संप्रदायात गुरुपरंपरा आहे. संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांशी जनाबाईंचा संबंध आला आहे.
चंद्रभागेच्या तिरी
संत नामदेवांच्या घरातील कामे करीत असताना जनाबाईच्या मुखी विठ्ठलाचे अभंग, नामस्मरण असे. नामदेवांचे घर हे मंदिराच्या समोरच असल्याने त्यांचे नियमित दर्शन होत असे. संत नामदेवांचे कीर्तन त्या तल्लीन होऊन ऐकत असत. एकदा असेच कीर्तन ऐकत असताना खूप उशीर झाला. या गडबडीत नामदेवांचे कपडे धुण्याचे विसरले. त्यामुळे त्या धावत कपडे घेऊन चंद्रभागेवर गेल्या, तेव्हा त्यांना मदतीला एक वृद्ध स्त्री आली.
तिने जनाबाईला घरी पाठवून भांडी घासण्यास सांगितले. कपडे मी तोपर्यंत धुऊन वाळू घालते, असे ती म्हणाली. जनाबाई घरची कामे आटोपून चंद्रभागेवर आल्या, तेव्हा कपडे स्वच्छ धुतले होते. त्या स्त्रीला तिने नाव विचारले, तेव्हा ती हसत हसत निघून गेली. हा प्रसंग नामदेवांना सांगितल्यावर तुझ्या मदतीला साक्षात विठ्ठल आले होते, असे त्यांनी सांगितले. आपल्या मदतीला विठ्ठल येऊनही आपण त्याला ओळखू शकलो नाही याचे त्यांना फार दु:ख झाले.
वधस्तंभाचा सुळा आपोआप वितळला
संत जनाबाई दासी म्हणून रहात असल्याने त्यांना अनेक कामे करावी लागत असत. जात्यावर दळण दळताना त्या अभंग किंवा श्लोक गुणगुणत. त्यात खंड पडू नये म्हणून विठ्ठल मदतीला येत असे. केरकरचा टोपलीत भरल्यानंतर टोपली वाहण्याचे काम विठ्ठल करीत असे. एकदा विठ्ठलाच्या गळ्यातील रत्नजडीत हार चोरीला गेला. हार जनाबाईंने चोरल्याचा आळ आल्यानंतर तिला सुळावर चढवण्याची शिक्षा देण्यात आली. सुळाकडे जात असताना तिच्या मुखी मात्र विठ्ठलाचे स्मरण होते. सुळ्याजवळ आल्यानंतर आपोआप सुळा वितळला आणि त्याचे पाणी झाले, अशी कथा आहे. तिच्या अद्भूत अशा भक्तीची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. त्यामुळे तिला एकदा भेटण्यासाठी संत कबीर पंढरपूरजवळ गोपाळपूर येथे आले. तेथे दोन महिलांमध्ये गोवर्यांवरून भांडण सुरू होते.
आपल्यापैकी जनाबाई कोण हे विचारल्यावर दुसर्या महिलेने तुच्छ भाषे त जनाबाईंचा उल्लेख केला. भांडणामुळे कबीरही साशंक झाले. तेव्हा एक महिला म्हणाली, आता आलाच आहात, तर गोवर्यांचे वाटप करा. पण ते कसे करावे हा प्रश्न कबीरांना पडला. तेव्हा जनाबाई म्हणाली,गोवरी कानाला लावल्यानंतर ज्या गोवरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती माझी. त्याप्रमाणे कबीरांना निवाडा केला. जनाबाईला आपली ओळख सांगितली. दोन संतांची अशी अद्भूत भेट झाली. संत जनाबाईंनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही पंढरपुरात ठेवण्यात आल्या आहेत.
धरीला पंढरीचा चोर
संत जनाबाईंचे साडे तीनशेवर अंभग आज मुद्रितावस्थेत आहेत. याशिवाय कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा, हरिश्र्चंद्राख्यान अशा आख्यानरचना पण त्यांच्या नावावर आहेत. संत जनाबाईंच्या थाळीपाक व द्रौपदी स्वयंवर या भावमधुर आख्यानांनी महाकवी मुक्तेश्र्वरांना (संत एकनाथांचे नातू) स्फूर्ती मिळाली. धरीला पंढरीचा चोर हा गाजलेला अभंग त्यांनीच लिहिला. या अभंगाचा समावेश पंढरीची वारी या चित्रपटात आहे. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत. पंढरपूर येथे संत नामदेवांनी समाधी घेतली, तेथे आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी त्या समाधीस्त झाल्या.
संत जनाबाईंची समाधी पंढरपुरात असली तरी गंगाखेड येथे त्यांच्या नावाने मंदिर आहे. तीर्थक्षेत्र विकास योजनेतंगर्तत या मंदिर परिसराचा विकास झाला असून दोन दिवसापूर्वीच ४८ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे.