“ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” लिहिणार्‍या संत बहिणाबाई या छत्रपती संभाजीनगरच्या...  file photo
छत्रपती संभाजीनगर

“ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” लिहिणार्‍या संत बहिणाबाई या छत्रपती संभाजीनगरच्या...

कन्‍नडजवळील देवगाव रंगारी येथे जन्‍म झालेला आणि शिऊर येथे समाधी

पुढारी वृत्तसेवा

Saint Bahinabai was from Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” हा अभंग वारकर्‍यांच्या मुखी नेहमी असतो. पण हा अभंग लिहिणार्‍या संत बहिणाबाई या छत्रपती संभाजीनगरच्या... कन्‍नडजवळील देवगाव रंगारी येथे जन्‍म झालेला आणि शिऊर येथे समाधी घेतलेल्‍या बहिणाबाईंची फारशी माहिती कोणाला नाही.

(संत बहिणाबाई आणि “मन वढाय वढाय” लिहिणार्‍या खादेशातील कवयित्री बहिणाबाई चौधरी हे केवळ नामसाधर्म्य.) संत बहिणाबाईंचा जन्म १५५१ मध्‍ये देवगाव रंगारीला झाला. त्‍यांच्या मातोश्रीचे नाव जानकी व पित्‍याचे आऊजी असे होते. पाचव्‍या वर्षी त्‍यांचा विवाह तीस वर्षीय रत्नाकर (गंगाधर) पाठक यांच्याशी झाला. संत बहिणाबाईना बालपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. घरीदारी, शेतात काम करीत असताना त्‍यांच्या मुखी देवाचे नाव असे. पण काही कारणाने बहिणाबाई आई वडिल आणि पतीसह पंढरपूर, रहिमतपूर, शिखर शिंगणापूर व नंतर कोल्‍हापुरात गेल्‍या.

कोल्‍हापुरात त्‍या हिरंभटाच्या वाड्यात राहू लागल्‍या. कोल्‍हापुरातच जयराम स्‍वामीच्‍या कथा कीर्तनाचा बहिणाबाईंवर प्रभाव पडला व त्‍यांनी संत तुकारामांचा अनुग्रह घेण्याचे ठरविले. पण तोपर्यंत संत तुकारामांचे वैकुंठगमन झाले होते. तिची भक्‍ती पाहून तुकोबारायांनी त्‍यांना दृष्टांत दिला. एक मतप्रवाह असाही आहे की, त्‍या काही काळ देहू येथे राहिल्‍या. देहू येथील विठ्ठल मंदिरातीलच एका ओवरी मध्ये ते राहू लागले. देहू येथेच संत तुकारामांनी त्‍यांना प्रत्यक्ष अनुग्रह दिला. संत बहिणाबाईंनी जवळपास सातशेवर अभंग व इतर रचना केल्‍या.

घोंगडीला वाजली थंडी

संत बहिणाबाईंच्या जीवनातील काही दृष्टांत पांडुरंग भक्‍तीची साक्ष देतात. एके वर्षी वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना अचानक थंडी वाजून ताप आला. पंढरीला जाणे अशक्‍य होते की काय असे त्यांना वाटू लागले. तरीपण विठूरायाला भेटण्याची तळमळ त्‍यांना स्‍वस्‍थ बसू देईना. त्‍यांनी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला विनंती केली, "ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवढी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगीन." ही घोंगडी त्यानी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या.

त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड थंडी भरल्‍थासारखे हालत होते. एकदा बहिणाबाई रामाच्या मंदिरात पूजा करत होत्या, त्यावेळेस रामदास स्वामींनी बहिणाबाईंना दिलेल्या हनुमानाच्या मूर्तीने तोंड उघडले व बहिणाबाईंच्या हाताने तीर्थ पिले. सध्या ती मूर्ती शिऊर गावातील त्‍यांच्या निवासस्थानी मंदिरात सुखरूप आहे.

वयाच्या बहात्तराव्या वर्षी बहिणाबाईंनी शिऊर येथे देह ठेवला. देह ठेवण्यापूर्वी त्यांनी आपला मुलगा विठोबा यास बोलावून घेतले आणि मागील १२ जन्मांचे वर्णन सांगितले. पतीचे व आपले गुरु तुकोबांचे स्मरण केले. ज्ञानेश्वरी वाचन केले. शेवटी अश्विन शुद्ध प्रतिपदा, बुधवार शके १६२२ या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबर १७०० रोजी त्यांनी देह ठेवला.

गाजलेला अभंग

संत बहिणाबाईंनी वारकरी परंपरेचा गौरव करणारी अनेक अभंग लिहिले आहेत. तरी, संत कृपा झाली..हा सगळ्यांना माहिती आहे. अभंग पुढीलप्रमाणे.

संत कृपा झाली। इमारत फळा आली।

ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।

नामा तयाचा किंकर। तेणे विस्तरिले आवार।

जनी जनार्दन एकनाथ। स्तंभ दिला भागवत।

तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।

बहिणा फडकती ध्वजा। तेणे रूप केले ओजा॥

डॉ. सदानंद मोरे लिहितात..

संत साहित्‍याचे अभ्यासक आणि संत तुकारामांचे वंशज डॉ. सदानंद मोरे बहिणाबाईंबद्दल लिहितात, बहिणाबाई या वारकरी परंपरेतील अखेरच्या कवयित्री. त्‍या तुकाराम महाराजांच्या समकालीन, मराठी इतिहासात बहिणाबाईंचे स्‍थान अनेक कारणांमुळे अनन्‍यसाधारण मानावे लागेल. परमार्थाची वाटचाल करीत असताना त्‍यांना स्‍त्री म्‍हणून संघर्ष करावा लागला. त्‍यांच्या तुका झालासे कळस या एकाच अभंगावरून त्‍यांची आलकनशक्‍ती आणि आवाका या बाबी ध्यानात येतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT