Rural police investigation leads to the closure of a Telangana-based company
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात ठिकठिकाणी घातक औद्योगिक रासायनिक कचरा बेकायदेशीररीत्या टाकण्याच्या गंभीर प्रकरणाचा छडा लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट तेलंगणा राज्यापर्यंत पोहोचले असून, ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या भक्कम पुराव्यांच्या आधारे तेलंगणा प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्हीबीआर ग्रीन एन्व्हायर्नमेंट प्रा. लि. या कंपनीला क्लोजर ऑर्डर (कामकाज बंद करण्याचे आदेश) बजावली आहे. पोलिसांच्या या आंतरराज्य कारवाईमुळे रसायन माफियांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यातील पळशी, सिल्लोड शहर, फर्दापूर, आळंद, शिवूर आणि तोंडापूर या भागात घातक रसायनांचे ड्रम टाकल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावरील ड्रम, वाहनांची हालचाल, मोबाईल संपर्क आणि आर्थिक व्यवहारांचा सखोल तांत्रिक तपास करून या बेकायदेशीर विल्हेवाटीमागील साखळी उघडकीस आणली.
या कारवाईत पोलिसांनी तब्बल १,६०१ ड्रममधील ३ लाख ५२ हजार २२० लिटर घातक औद्योगिक रसायन, ४० टन रासायनिक पावडर आणि ५० टन रसायनमिश्रित दूषित माती जप्त केली आहे. याशिवाय ३ ट्रक, १ हायड्रा मशीन आणि ७ मोबाईल असा ८० लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणात एकूण १३ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
तेलंगणा कनेक्शन आणि मालकाला अटक
तपासादरम्यान या रसायनांचे मूळ तेलंगणातील सांगारेड्डी जिल्ह्यातील मुनीपल्ली येथे असल्याचे निष्पन्न झाले. ग्रामीण पोलिसांच्या पथकाने थेट तेलंगणा गाठून व्हीबीआर ग्रीन एन्व्हायर्नमेंट प्रा. लि. या कंपनीवर धडक दिली. तेथे जिल्ह्यात फेकलेल्या रसायनांशी साधर्म्य असलेले ड्रम, लेबले आणि बॅच क्रमांक आढळून आले. तपास पथकाने हे महत्त्वाचे पुरावे जप्त करत कंपनीचा मालक वीरशम भीमैया खरचेला (रा. मुनीपल्ली, जि. सांगारेड्डी) याला अटक केली.
वीजपुरवठा खंडित अन् कंपनीवर बंदी
ग्रामीण पोलिसांनी हा सर्व वैज्ञानिक आणि तांत्रिक पुरावा तेलंगणा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिला. मंडळाने याची गंभीर दखल घेत कंपनीची तपासणी केली असता, तिथे उघड्यावर मोठ्या प्रमाणावर घातक कचरा आणि स्पिलेज आढळून आले. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीविरुद्ध थेट क्लोजर ऑर्डर जारी करत कामकाज तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले. तसेच, टीजीएसपीडीसीएल यांना संबंधित उद्योगाचा वीजपुरवठा तात्काळ खंडित करण्याचेही आदेशित केले. केवळ आरोपींना अटक न करता थेट गुन्ह्यांच्या मुळापर्यंत जाऊन कंपनीला टाळे ठोकण्याची ग्रामीण पोलिसांची ही कारवाई निर्णायक ठरली आहे.