Rural consumers face increased difficulties as new gas connections remain unavailable!
पिशोर, पुढारी वृत्तसेवा: ग्रामीण भागात नवीन घरगुती गॅस कनेक्शन देण्याची प्रक्रिया बंद असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या अनियमित पुरवठ्यामुळे ग्राहक त्रस्त असताना, दुसरीकडे नवीन गॅस कनेक्शन मिळत नसल्याने अनेक कुटुंबांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.
सध्या लग्नसराईचा हंगाम जवळ आला असून, ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये विवाह सोहळे, धार्मिक कार्यक्रम आणि विविध कौटुंबिक समारंभांची लगबग सुरू आहे. अशा वेळी स्वयंपाकासाठी गॅसची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. मात्र, नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांना कनेक्शन मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
विशेषतः नव्याने संसार थाटणाऱ्या कुटुंबांना घरगुती गॅस जोडणीची आवश्यकता असते. मात्र, नवीन कनेक्शन प्रक्रिया बंद असल्याने नागरिकांना पारंपरिक चुली किंवा इतर पर्यायी इंधन व्यवस्थेचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे.
शासनाकडून स्वच्छ इंधनाचा वापर वाढविण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असताना प्रत्यक्षात नवीन गॅस कनेक्शन उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना या परिस्थितीचा अधिक फटका बसत असून, गॅस एजन्सीच्या कार्यालयात चौकशी करूनही समाधानकारक माहिती मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
लग्नसराईच्या काळात गॅसची वाढती मागणी लक्षात घेता संबंधित गॅस कंपन्या आणि वितरकांनी नवीन गॅस कनेक्शन देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी. तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा नियमित आणि वेळेवर पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांची वाढती गरज
ग्रामीण भागातील ग्राहकांची वाढती गरज लक्षात घेऊन नवीन गॅस कनेक्शन वितरण तातडीने सुरू करावे, अन्यथा सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय आणखी वाढण्याची शक्यता आहे. संबंधित प्रशासन आणि गॅस कंपन्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पिशोर परिसरातील नागरिकांकडून होत आहे.