RTO takes action against 54 travel holders
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळीत प्रवाशांकडून ट्रॅव्हल्सचालक अवाच्या सव्वा तिकीट उकळतात. या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त कार्यालयांने तपासणी करून कारवाईचे आदेश दिले होते. या आदेशानुसार या दरम्यान १५० ट्रॅव्हल्स बसची तपासणी केली. यात विविध कारणांमुळे ५४ ट्रॅव्हल्सधारकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून ५ लाखांपेक्षाही जास्त दंड वसूल केल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.
परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार १७ ऑक्टोबरपासून आरटीओच्या पथकाने बस तपासणी सुरू केली होती. या दरम्यान गाडीचे फिटनेस, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, तिकीट जास्त आकारणे आदी बाबींची तपासणी केली. आरटीओच्या दोन पथकांनी सुमारे १५० ट्रॅव्हल्स बसची तपासणी केली. यात काही चालकांकडे कागदपत्रे नव्हती तर काही बसचालकांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्याचे आढळून आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे ५४ बस चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करत त्यांच्यांडून लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कार्यालयात जनजागृती
आरटीओच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक ट्रॅव्हल्सच्या बुकिंग कार्यालयांवर जाऊन ठरलेल्या तिकिटापेक्षा जास्त भाडे आकारले तर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला. त्याचबरोबर प्रवाशांनाही नियमांपेक्षा जास्त भाडे आकारले तर आरटीओकडे तक्रार करण्याबाबत सूचना दिल्या.
दोन स्वतंत्र पथके
दिवाळी दरम्यान ट्रॅव्हल्सचालकांची तपासणी करण्यासाठी आरटीओ कार्यालयाने स्वतंत्र दोन पथके स्थापन केली होती. या पथकांनी बाहेरून येणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी केली. यात एकही नियमांपेक्षा जास्त भाडे आकारल्याची तक्रार आली नाही किंवा तसे प्रवाशीही तपासणीत मिळून आले नसल्याची माहिती काठोळे यांनी दिली.