RTO: Administration from new building from January 26
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : साजापूर-करोडी परिसरात आरटीओ कार्यालयाची पाच मजली टोलेजंग इमारतीचे काम पूर्ण झालेले आहे. मुख्य गेट, कॅन्टीनचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम होताच २६ जानेवारी २०२६ पासून नव्या इमातीतून कारभार सुरू करण्याची दाट शक्यता आहे. जुन्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारत उभारण्यात येणार असून, तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.
करोडी परिसरात आरटीओची नवी इमारत ३७ कोटी १५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आली आहे. या इमारतीत अत्याधुनिक असे वाहन परीक्षण व निरीक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच अधिकाऱ्यांप्रमाणेच वाहनधारकांसाठीही येथे वाहनतळ, स्वच्छतागृह, वेटिंग हॉल, कॅन्टीन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून, मुख्य गेट आणि कॅन्टीनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचे ठेकेदारांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वीच या कामांची पाहणी प्रादेशिक परिवहन अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी केली आहे.
नव्या इमारतीतून चालणार कारभार
नव्या इमारतीतून ट्रान्सपोर्ट, नॉन ट्रान्सपोर्ट तसेच इतर अकॅडमिक कामे चालणार आहेत. जुन्या आरटीओ कार्यालयापासून नवी इमारत सुमारे १० किलोमीटर दूर असल्याने कामानिमित्त गेलेल्या वाहनधारकांना मात्र पूर्ण दिवस वाया घालावा लागणार आहे. नव्या इमातीतून १ प्रादेशिक परिवहन अधिकारी, २ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ८ मोटर वाहन निरीक्षक, २० सहायक मोटार वाहन निरीक्षक व अकॅडमिक स्टाफ येथून काम करणार आहेत
जुन्या इमारतीबाबतचा प्रस्ताव
जुन्या आरटीओ कार्यालयाच्या जागेवर अधिकाऱ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर, डिटेशन यार्ड, लर्निंग लायसनचे कांऊटर, खटला विभाग, तसेच फ्लाईंग स्कॉड येथून कारभार पाहणार आहे. त्यासाठी या इमारतीच्या जागेवर नवीन इमारत बनवण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला आहे. प्रस्ताव मंजूर होताच या ठिकाणी कामाला सुरुवात होणार आहे. येथे ४ मोटार वाहन निरीक्षक, १६ सहायक मोटार वाहन निरीक्षक, ट्रेनिंग सेंटर सांभाळणारा अधिकारी, तसेच खटला विभागाचा पूर्ण स्टाफ या ठिकाणीच राहणार आहे.
अशी असेल नवी इमारत
जागा-४.३७ हेक्टर (पावणेअकरा एकर)
मुख्य इमारत- ३८४६ स्क्वे.मी.
खर्च-३७.१५ कोटी
येथून अंतर- १० किलोमीटर
अत्याधुनिक वाहन परीक्षण केंद्र
वाहनधारकांसाठी वाहनतळ व इतर सुविधा
ट्रान्सपोर्ट, नॉनट्रानस्पोर्ट विभाग
२५० ते ३०० मीटर टेस्टिंग ट्रॅकची लांबी
जुन्या इमरतीत राहणारे विभाग
ट्रेनिंग सेंटर
डिटेशन यार्ड
लर्निंग लायसनचे काऊंटर
खटला विभाग
फ्लाईंग स्कॉड