सुसाट वाऱ्यामुळे शहरातील झाडे उन्मळून पडली. (इन्सेट) चिकलठाणा विमानतळाचे उडालेले छप्पर. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar weather : वादळी वाऱ्यासह रोहिण्या बरसल्या; विमानतळाचे छप्पर हवेत उडाले !

वाऱ्याचा वेग ताशी ६३ किमीवर; गाररवेड्यात झाडे उन्मळली, उल्कानगरीत डीपीला आग

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : विक्रमी वाढणाऱ्या तापमानामुळे आणि कडक उन्हाच्या चटक्यांमुळे होरपळणाऱ्या शहरवासीयांना सोमवार (दि. २५) पासून सुरू झालेल्या रोहिणी नक्षत्राच्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. मात्र, दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन सुटलेल्या वादळी वाऱ्याने शहरात मोठी दाणादाण उडवली.

वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की, चिखलठाणा विमानतळावरील पत्र्याचे छप्पर हवेत उडाले. यासह गारखेड्यात झाडे कोसळली आणि अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. सुमारे अर्धा तास चाललेल्या या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी शहर आणि वाळूज परिसरात नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

गेल्या आठवडाभरापासून शहरात तापमानात आणि हवेतील आर्द्रतेत सातत्याने वाढ होत होती. सोमवारी दुपारी अचानक वाऱ्याचा वेग वाढला आणि आकाश काळ्या ढगांनी व्यापले. त्यानंतर विजांच्या कडकडाटात सिडको, हडको, जालना रोड, चिखलठाणा, उस्मानपुरा, समर्थनगर, क्रांती चौक, मिलकॉर्नर, घाटी, सातारा-देवळाई आणि पुंडलिकनगर परिसरात जोरदार सरी कोसळल्या. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांनी दुकानांच्या शेडखाली व इमारतींच्या आडोशाला आश्रय घेतला.

पावसापूर्वी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे गारखेडा भागातील पहाडे कॉर्नर व झांबड इस्टेट येथील रेणुकामाता मंदिर कमानीजवळ दोन मोठी झाडे उन्मळून पडली. तर उल्कानगरी भागात महावितरणच्या डीपीला आग लागण्याची घटना घडली.

वाऱ्याचा वेग ताशी ६३ किमीवर ; पावसाची नोंद

चिखलठाणा वेधशाळेचे हवामान सहायक सुनील निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर परिसरात ४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर एमजीएम विद्यापीठातील वेधशाळेचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, शहरात अवघे दोन मिमी पाऊस पडला. एमजीएम विद्यापीठातील हवामान वेधशाळेत वाऱ्याचा वेग ४६.३ किमी प्रतितास, गांधेली वेधशाळेत ६३.३ किमी प्रतितास तर पडेगाव हवामान वेधशाळेत ५१.५ किमी प्रतितास एवढा नोंदवला गेला.

वाळूजमध्ये कामगारांची तारांबळ ; वीज गुल

वाळूज महानगर परिसरात सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास चाललेल्या या पावसामुळे कंपनीतून सुटी होऊन घरी परतणाऱ्या कामगारांची तारांबळ उडाली. अनेकांना पावसात भिजतच घर गाठावे लागले. परिसरातील पंढरपूर आणि शहरातील अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला. उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

विमानतळाच्या छताचे छप्पर उडाले

वादळी वाऱ्याचा चिकलठाणा विमानतळाच्या छताला फटका बसला असून, सायक्लोस्टाईप डेव्हलप केलेल्या भवारीचा (चक्री) एक लेअर उडून त्यातील काही भाग खाली कोसळल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणचे प्रमुख शरद येवले यांनी दिली. यावेळी प्रवासी विमानतळावर नव्हते. घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. पुढील, दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT