छत्रपती संभजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरात महापालिका प्रशासनाने पार्किंगच्या नावाखाली सामान्यांची वाहने उचलून नेत आहे. त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दंड वसूल करीत आहे. महापालिका शहरवासीयांची लूट करीत असून, हा प्रकार त्वरित थांबवा, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.६) आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. तसेच मिटिंग हॉलमध्ये नकली नोटा उधळून प्रशासनाचा निषेध केला.
शहरातील एकाही रस्त्यालगत महापालिकेने वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था केली नाही. शिवाय, मुख्य बाजारपेठेत शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येही वाहनांच्या पार्किंगची सूचना नाही. तेव्हा बाजारपेठेत खरेदीसाठी येणारे वाहनधारक गाड्या कुठे उभ्या करतील, असा सवाल उपस्थित करीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. सिडको हडको असो की, शहराचा इतर कुठल्याही भाग असो. तेथील रस्त्यावर वाहने उभी केली की, महापालिकेचे पथक येऊन ती बाहने उचलून नेत आहेत. वाहतुकीला अडथळा नसतानाही बाहने सर्रासपणे महापालिकेचे पथक उचलून नेत आहे. त्यानंतर वाहनधारकांकडून अण्वाच्या सच्या दंड बसूल करीत आहे. महापालिका प्रशासन दंडाच्या नावाखाली शहरवासीयांची लूट करीत आहे.
हा प्रकार महापालिका प्रशासनाने त्वरित बंद करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी महापालिकेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्तच काय तर उपायुक्त आणि प्रमुख अधिकारीही उपस्थित नव्हते. त्यामुळे शहर अभियंता फारुख खान यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून त्यांना आश्वासन दिले. दरम्यान, पैशासाठी महापालिका अधिकारी काहीही करू लागले, असे म्हणत त्यांनी नकली नोटा उधळल्या. यावेळी गणेश साळुंके यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.
महापालिका वाहन पार्किंगच्या नावाखाली नागरिकांची लूट करीत आहे. जोपर्यंत महापालिका वाहन पार्किंगची व्यवस्था करणार नाही, तोपर्यंत कारवाई करू नये, यापुढेही कारवाई सुरू राहिली तर आता केवळ नकली नोटा उधळल्या, यानंतर मनसे थेट अधिकाऱ्यांच्या वाहनांच्या काचा फोडतील, असा इशाराही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.